सिंधुदुर्ग – गेली वर्षानुवर्षे शिवसेना आणि कोकणचे भावनिक नाते राहिलेले आहे. कोकणी जनतेची नाळ शिवसेनेसोबत जोडली गेली आहे. त्याच ओढीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे चक्रीवादळानंतर झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी स्वतः कोकणात आले. आमदार नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला हॉलिडे पँकेज म्हणुन हिणवले आहे. कोकणच्या जनतेवर एवढे मोठे संकट ओढवलेले असताना स्वतःला कोकणचे भाग्यविधाते म्हणवणारे नारायण राणे नेमके कोणत्या बिळात दडून बसले आहेत…? आमदार नितेश राणेंनी वडीलांना पिंजऱ्यामध्ये बंद करून ठेवले आहे की काय…??असा सवाल शिवसेना नेते संदेश पारकर यांनी केला आहे.
सिंधुदुर्गातील जनतेने नारायण राणेंना सहा वेळा आमदार बनवले. कोकणी जनतेच्या पाठिंब्यावर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे कोकणावर असलेले अपरंपार प्रेम यामुळे कोकणचा प्रतिनिधी म्हणुन बाळासाहेबांनी आठ महिन्यांसाठी नारायण राणेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवले. मात्र खाल्ल्या मिठाला जागायची सवय नसलेले नारायण राणे शिवसेनेशी प्रामाणिक राहिले नाहीत. महाभारतात अश्वत्थामा भळभळती जखम घेऊन तेल मागत सगळीकडे फिरत होता. अगदी त्याप्रमाणेच शिवसेना सोडल्यानंतर अक्षरशः मुख्यमंत्रीपदाची याचना करत नारायण राणे सर्व पक्षांच्या दारोदारी फिरले परंतु कुठल्याच पक्षाने त्यांना मुख्यमंत्री पदासाठी लायक समजले नाही. कॉंग्रेसमध्ये दिवंगत अहमद पटेल, प्रभा राव, मार्गारेट अल्वा या सर्वांनी प्रत्येकवेळी नारायण राणेंना मुख्यमंत्रीपदाचे आमिष दाखवुन त्यांची राजकीय कुचेष्टा केली. मात्र शिवसेना व सिंधुदुर्गातील जनतेमुळे नारायण राणेंनी महसुल मंत्री, विरोधी पक्षनेता आणि मुख्यमंत्री अशी मोठमोठी पदे भूषवायला मिळालीत. आज त्याच सिंधुदुर्गातील जनतेवर अस्मानी संकट कोसळलेले असताना नारायण राणे जिल्ह्यात फिरकले सुद्धा नाहीत. यालाच शुद्ध भाषेत बेईमानी असे म्हणतात. सिंधुदुर्गातील जनतेने विधानसभा निवडणुकीत केलेल्या पराभवाचा राग मनात ठेवून नारायण राणे आकसाने वागत आहेत. कोकणच्या मातीवर निस्सीम प्रेम करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंवर टिका करण्याऐवजी नितेश राणेंनी कोकणच्या जनतेशी सूडबुद्धीने वागणाऱ्या आपल्या वडीलांच्या अनुपस्थितीवर सर्वप्रथम भाष्य करायला हवे,असा टोला संदेश पारकर यांनी लगावला आहे.
एक काळ असा होता की नारायण राणे शिवसेना किंवा कॉंग्रेस पक्षामध्ये असताना कोणताही महत्वाचा नेता कोकण दौऱ्यावर यायचा असेल तर त्याच्या दौऱ्याची आखणी करायचे. तेच प्रमुख सुत्रधार असायचे आणि कोकणात आल्यावर राज्यातील नेतेमंडळी त्यांच्याच अवतीभोवती फिरायची. दोन दिवसांपूर्वी तौक्ते चक्रीवादळाची पाहणी करण्यासाठी भाजपची नेतेमंडळी कोकण दौऱ्यावर आली होती. त्यात विधानसभा व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते, माजी राज्यमंत्री यांचा समावेश होता. मात्र त्यात माजी मुख्यमंत्री नारायण राणे कुठेच दिसले नाहीत. राज्यसभेवर खासदार असणाऱ्या नारायण राणेंना भाजपचे नेते राज्याच्या राजकारणात खिचगिणतीतही धरत नाहीत. भाजपने नारायण राणेंना पद्धतशीरपणे दिल्लीला पाठवून राज्याच्या राजकारणातून कायमचे बाहेर केले आहे. आता हळूहळू विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, माधव भंडारी अशा कालबाह्य नेत्यांच्या यादीत नारायण राणेंचा समावेश करून त्यांना राजकारणातुन निव्रुत्ती घ्यायला लावतील. एकेकाळी कोकणचे नेते म्हणुन मिरवणाऱ्या नारायण राणेंना भाजपची नेतेमंडळी अतिशय तुच्छतापूर्वक वागणुक देत आहेत. आपले राजकीय भवितव्य अधांतरी असल्यामुळेच नारायण राणे हा सगळा अपमान निमुटपणे सहन करीत आहेत. त्यांच्यापुढे भाजपशिवाय अन्य कोणताही राजकीय पर्याय शिल्लकच राहिलेला नाही. उत्कर्षाला सीमा असते परंतु अधपतनाला नसते याचे नारायण राणे हे आदर्श उदाहरणच म्हणावे लागेल,असेही संदेश पारकर यांनी म्हटले आहे.



