सिंधुदुर्ग – शिक्षण हाच परिवर्तनाचा पाया आहे. आपली सामाजिक परिस्थिती बदलली पाहिजे आणि आर्थिक उन्नती झाली पाहिजे तर आपल्याला शिकावे लागेल, असे मत रोटरी क्लब कणकवली सेंटरच्या अध्यक्ष वर्षा बांदेकर यांनी व्यक्त केले.
कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे येथील नाग्या महादू निवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शालेय ड्रेस, औषधे, वसतिगृहासाठी लागणारे अन्नधान्य, विविध जीवनावश्यक वस्तू यांचे रोटरी क्लब कणकवली सेंटरच्या माध्यमातून आणि कणकवली मधील व्यापारी रुपेश खाडये यांच्या ५० व्या जन्मदिनानिमित्त सामाजिक बांधिलकी राखत खाडये कुटुंबीयांच्या वतीने वाटप करण्यात आले याप्रसंगी बांदेकर बोलत होत्या. विशेष म्हणजे या वसतिगृहात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अत्यंत तळागाळातला वर्ग म्हणजे आदिवासी कातकरी समाजातील मुले मुली शिक्षण घेत आहेत. या मुलांच्या शिक्षणासाठी रोटरीच्या माध्यमातून जे काही करणे शक्य आहे ते आम्ही निश्चित करू असे देखील वर्षा बांदेकर यावेळी म्हणाल्या. तसेच समाजातील तळागाळातल्या वर्गाला स्वतः सोबत पुढे घेऊन जाण्यासाठी इतरांनी देखील मदतीचा हात पुढे करावा असे आवाहनही वर्षा बांदेकर यांनी केले.
याप्रसंगी रोटरी क्लब कणकवली सेंटरचे माजी अध्यक्ष रो. डॉ. विद्याधर तायशेटे, सचिव रो ऊमा परब, रो. नितीन बांदेकर, रो. अनिल कर्पे, रो. आनंद पोरे, ॲनेट राजस परब, कणकवली मधील व्यापारी रूपेश खाडये, सौ ईषा खाडये, सौ निलम पारकर, श्री राजा राजाध्यक्ष, शोषित मुक्ती अभियान संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते उदय आईर, श्री कदम, सौ आईर आदी उपस्थित होते.