शाळांना अनुदान मागण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात शिक्षकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. तसेच औरंगाबाद येथेही असाच प्रकार घडला आहे. याचा निषेध करण्यासाठी आणि सरकारकडून अनुदानाचा पूर्ण प्रश्न सोडवला गेला नाही, म्हणून 5 सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिनावर बहिष्कार टाकणार असल्याचा ईशारा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी दिला. राज्यात गुरूवारी सर्वत्र शिक्षकांवर झालेल्या अन्यायाविरूद्ध निषेध व्यक्त केला जाणार असल्याचेही गाणार यांनी सांगितले. अनुदानाच्या मागणीसाठी आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या शिक्षकांवर लाठीहल्ला करणे हे अमानवी कृत्य होते. त्यासाठी सरकारने आतापर्यंत कोणतीही ठोस कारवाई करून संबंधित अधिकाऱ्याला अटक केलेली नाही. यामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे. म्हणुन शिक्षक दिनावर बहिष्कार टाकत असल्याचे गाणार म्हणाले. मुंबईत काळा दिन साजरा करण्यासाठी शिक्षक गुरुवारी सकाळी काळया रंगाचे कपडे, काळी टोपी घालून तर काही जण काळी फित बांधून आझाद मैदानावर जमा होणार आहेत. तर जे मैदानावर येवू शकत नाही त्यांनी आपापल्या शाळेत सर्व शिक्षक यांनी काळे कपडे टोपी घालून काला दिन साजरा करणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना काळ्या फिती दंडावर बांधायला सांगितल्या जाणार असून शाळेत कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जाणार नसल्याचे महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानीत शाळा कृती समितीचे मुंबई अध्यक्ष प्रशांत रेडिज यांनी सांगितले. तसेच ज्यांच्या स्मरणार्थ शिक्षक दिवस साजरा केला जातो त्या सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन व अभिवादन मात्र सर्व शाळांमध्ये केले जाणार असल्याचेही रेडिज यांनी स्पष्ट केले.