सिंधुदुर्ग – जिल्हय़ातील विविध माध्यमिक शाळांमधून कार्यरत असलेल्या आणि न्यायप्रविष्ट प्रकरण असलेल्या 11 शिक्षकांचे वेतन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱयांनी थांबविले होते. या निर्णयाविरोधात शिक्षक भारतीने आवाज उठवत आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र 11 पैकी नऊ शिक्षकांचे वेतन पुन्हा सुरू करण्याबाबतचे पत्र माध्यमिक शिक्षणाधिकाऱयांनी दिल्याने संघटनेच्या लढय़ाला आंदोलनापूर्वीच यश आले असल्याची माहिती शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी दिली. यापूर्वी वेतन थांबविण्याच्या कार्यपद्धतीविरोधातील बाब न्यायप्रविष्ट असतानाही माध्यमिक शिक्षणाधिकाऱयांनी वरिष्ठांच्या आदेशाशिवाय जून 2020 पासून या 11 शिक्षकांचे वेतन थांबविले होते. त्यांचे वेतन सुरू करण्यात यावे, अशी मागणी 20 जुलै रोजी शिक्षक भारतीने केली होती.