सिंधुदुर्ग – तळकोकणातील वेंगुर्ला नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीत भाजपचा झेंडा फडकला आहे. या निवडणुकीतुन नारायण राणेंनी महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला आहे. भाजपच्या उपनगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शितल आंगचेकर यांनी महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार नगरसेवक विधाता सावंत यांचा 10 विरुद्ध 7 अशा मताने पराभव केला आहे.
नगरसेवकांनी व्हिपला दाखविली केराची टोपली
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला नगरपरिषदेत काँग्रेसचे नगरसेवक विधाता सावंत यांना पक्षाने उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रिंगणात उतरले होते. यासाठी काँग्रेस पक्षाकडून गटनेते प्रकाश डिचोलकर यांनी व्हीप जारी केला होता. मात्र, काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या व सध्या भाजपमध्ये असलेल्या काही नगरसेवकांनी या व्हिपला केराची टोपली दाखवली. त्यामुळेच वेंगुर्ले नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपने आपला झेंडा रोवला आहे.
शिवसेना नगरसेवक राहिले तटस्थ
नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे नगरपरिषदेची राजकीय समीकरणे बदलली होती. अपक्ष म्हणून निवडून आलेले तुषार सापळे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. मात्र, आजच्या उपनगराध्यक्षच्या निवडणुकीत तुषार सापळे तटस्थ राहिले. त्यामुळे हा एक शिवसेनेला मोठा धक्का मानला जातो. वेंगुर्ला नगरपरिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. अवघे दोन महिने निवडणुकीसाठी शिल्लक आहेत. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष सहित भाजपची एकहाती सत्ता आहे. मात्र, काँग्रेस पक्षाने बजावलेला व्हिप आणि काँग्रेस पक्षावर निवडून येऊन भाजपच्या गोटात जाणाऱ्या नगरसेवकांनीही नाकारल्याने येत्या काही दिवसांमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप ही राजकीय लढाई वेंगुर्लात पाहायला मिळणार आहे.
राज्यात महाविकास आघाडी असतानाही व्हिपचा अनादर
वेंगुर्ला नगरपरिषदेमध्ये सत्ताधारी भाजपची सत्ता आहे नगराध्यक्ष भाजपचे असून एकूण 17 नगरसेवक्त भाजप 7, काँग्रेस 7, शिवसेना 2, अपक्ष 1 असे पक्षीय बलाबल आहे. मागच्या शिवसेना भाजपची युती काळात शिवसेनेच्या अस्मिता राऊळ उपनगराध्यक्ष होत्या. त्यांनी राजीनामा दिल्याने आज विशेष सभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्राताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडी असतानाही व्हिपचा अनादर काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी केल्याने महाविकास आघाडी उमेदवाराचा पराभव झाला.