“विलीनीकरण की उपमुख्यमंत्रीपद?”; सुनील तटकरेंनी शरद पवार गटाची कोंडी केली

0
2

मुंबई: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील राजकीय संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून शरद पवार गटाकडून होत असलेल्या टीकेला आता अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “विलीनीकरणानंतर इतर कुणाला उपमुख्यमंत्री व्हायचं होतं का?” असा खोचक सवाल करत त्यांनी पवारांच्या गटावर पलटवार केला आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर केवळ चार दिवसांत सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून झालेला शपथविधी टीकेचा विषय ठरला होता. यावर बोलताना तटकरे म्हणाले की, “शपथविधीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की, अंत्यसंस्कार पूर्ण होण्यापूर्वीच शरद पवार गटाने विलीनीकरणाची चर्चा का सुरू केली? ती घाई नव्हती का?” तटकरे यांनी विलीनीकरणाच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या असून, अजित पवारांशी अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले.

सुनिल तटकरे यांनी ठामपणे सांगितले की, पक्षाचा नेता निवडणे, त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देणे आणि विलीनीकरण करणे, हे पूर्णपणे दोन वेगळे विषय आहेत. शरद पवार गटाच्या एका नेत्याने अजित पवारांसोबत झालेल्या चर्चेचे तपशील जाहीर करण्याचा दावा केला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना तटकरे म्हणाले, “त्यांनी आधी ते तपशील जाहीर करू दे, मगच आम्ही त्यावर बोलू. वारंवार या विषयावर चर्चा करून काय साध्य करायचे आहे?”

अजित पवारांच्या रिक्त जागेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर तटकरे म्हणाले की, प्रफुल्ल पटेल आणि त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आमदार आणि कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन लवकरच संघटनात्मक निर्णय घेतले जातील.

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीच्या तांत्रिक बाबींवर भाष्य करताना तटकरे म्हणाले की, सभागृहाचा सदस्य नसतानाही मंत्री किंवा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यांच्या राज्यसभेच्या जागेबाबतची तांत्रिक बाजू पाहून योग्य वेळी निर्णय घेतला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here