मुंबई – दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात काही नेत्यांकडून विविध प्रकारच्या शंका, संशय व्यक्त केले जात आहेत. यात आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विमानातील ब्लॅक बॉक्स संदर्भात संशय उपस्थित केला आहे. ब्लॅक बॉक्स ज्या जागेवर असतो, विमानाचा तो भाग जसाच्या तसा होता. ११ हजार सेल्सिअसच्या आगीमध्येही त्या ब्लॅक बॉक्सला काही होऊ शकत नाही. मग तो जळाला कसा? असा प्रश्न आव्हाडांनी उपस्थित केला आहे.
पत्रकारांशी बोलताना आव्हाड म्हणाले, “मला सर्वात आश्चर्य वाटतं म्हणजे ब्लॅक बॉक्स जळून गेला. ब्लॅक बॉक्स ज्या जागेवर असतो, तो विमानाचा जो भाग आहे, तो जसाच्या तसा होता. दुसरी गोष्ट म्हणजे ब्लॅक बॉक्स ज्या मटेरियलचा बनवलेला आहे, ते मटेरियल आहे टायटॅनियम. म्हणजे, ११ हजार सेल्सिअसच्या आगीमध्येही त्या ब्लॅक बॉक्सला काही होऊ शकत नाही. अशी परिस्थिती असताना सरळ सांगितलं जातं की, ब्लॅक बॉक्स जळून गेला. माझ्यासारख्या चौकस मनाच्या माणसाला तर शंका येईलच की, ब्लॅक बॉक्स कसा जळून जाऊ शकतो?”
“यामुळे, रोहित पवार ज्या मागण्या करत आहेत, त्या मागण्यांमध्ये तथ्य आहे. कंपनी कुणाची आहे? कंपनीत पैसे कुणाचे आहेत? ते विमान किती तास उडलं होतं? त्याला एवढे तास उडण्याची परवानगी होती का? डीजीसीए काही कव्हर करायला बघतंय का? डीजीसीएचे अधिकारी कोणाच्या दबावाखाली आहेत? ही कंपनी कुठल्या पक्षाच्या अधिपत्याखाली चालते? हे सर्व प्रश्न आता आलेना समोर,” असेही आव्हाड म्हणाले. आव्हाड पुढे म्हणाले, “जेवढा चौकशीला उशीर करतील, जेवढी चौकशी लांबवतील, जेवढ्या खोट्या नाट्या गोष्टी सांगतील, की ब्लॅक बॉक्स जळून गेला, तेवढ्या संशयाला वाव मिळण्यास जागा निर्माण होत आहेत.”
“ब्लॅकबॉक्स जळून गेला, ही माझी सर्वात मोठी शंका…” –
दरम्यान, काल मुख्यमंत्री असे म्हणाले की, अनेक जण शंका उपस्तित करत असले तरी, तुमच्याकडे काही ठोस पुरावे असतील तर…, यावर बोलताना आव्हाड म्हणाले, “ब्लॅकबॉक्स जळून गेला, ही माझी सर्वात मोठी शंका आहे. जगातल्या कुठल्याही अपघातात ब्लॅक बॉक्स जळून गेला, असं कधीही सांगितलं गेलेलं नाही. त्यामुळे, शंकेला जर चौकशीच्या माध्यमातूनच वाव मिळणार असेल, तर शंका या उपस्थित होणारच.”



