सिंधुदुर्ग – वायंगणी-बागायतवाडी येथे घरात सिलेंडरचा स्फोट होऊन वडील व मुलाचा जागीच मृत्यू झाला. वसंत गणेश नाईक (७०) व गणेश वसंत नाईक (२९), अशी त्या दोघांची नावे आहेत. सुदैवाने वसंत यांची पत्नी मासे विकण्यासाठी बाहेर असल्यामुळे त्या अपघातात वाचल्या. मात्र घर अर्धे जळून खाक झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मृत वडील वसंत यांना काही दिवसापूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यामुळे प्रकृती खालावल्याने ते घराबाहेर पडत नसत. तर मृत त्यांचा मुलगा गणेश हा वडलांची देखभाल करण्यासाठी घरी असायचा. वसंत यांची पत्नी मासे विक्री करून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करत होती.
दरम्यान ती नेहमी प्रमाणे आज सकाळी मासे विक्री करण्यासाठी वेंगुर्ले बाजारपेठेत गेली होती. तर वसंत व गणेश हे बाप-लेक दोघेच घरात होते. त्यांच्या घराशेजारी जेवण बनविण्यासाठी पडवी बांधण्यात आली होती. त्या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. मात्र पहिल्यांदा पडविला आग लागली की, सिलेंडरचा स्फोट पहिला झाला, हे कळू शकले नाही. तर वेंगुर्ले पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.