सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील रेशनकार्ड धारकांच्या विविध समस्या तसेच मागण्यांच्या संदर्भात शिवसेना युवानेते श्री.संदेश पारकर यांनी महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री श्री.छगन भुजबळ यांची मुंबई येथे भेट घेतली.
ग्रामीण भागामधे चांगले नेटवर्क नसल्याने पॉज मशीन नीट चालत नाहीत त्यामुळे थंब लावताना समस्या निर्माण होते आणि रेशनकार्ड धारकांना वेळीच धान्य मिळत नाही. यासाठी चांगल्या नेटवर्कची सुविधा उपलब्ध करुन द्यावी आणि जुन्या मशिनच्या जागी नवीन चांगल्या दर्जाच्या पॉज मशिन द्याव्यात. ज्यांच्याकडे आधारकार्ड नाही त्यांच्यासाठी 12 अंकी नंबर बंधनकारक न करता पर्याय द्यावा जेणेकरून सर्वांना रेशनचा लाभ मिळेल.
रेशनकार्ड बदलण्याचा 3 महिन्यांचा कालावधी कमी करुन 15 दिवसांचा करावा. नवीन रेशनकार्ड लवकरात लवकर मंजुर करुन मिळावे यासाठी तांत्रिक विभागाला सक्त सुचना द्याव्यात. तसेच ईष्टांक नसलेल्या रेशनकार्ड धारकांनाही लाभ मिळावा यासाठी जिल्ह्यातील ईष्टांक जास्तीत जास्त वाढवून मिळावा. ज्या तालुक्यात स्वतंत्र ऑपरेटर नाहीत तेथे त्वरीत नवीन ऑपरेटर नियुक्त करावेत. या रेशनकार्ड धारकांच्या विविध मागण्या आणि समस्यांच्या संदर्भात संदेश पारकर यांनी मंत्रीमहोदयांशी सविस्तर चर्चा करुन निवेदन दिले.