शहापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दौलत दरोडा रात्रीपासून बेपत्ता झाल्याची तक्रार शहापूर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. ही तक्रार माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी दाखल केली असून त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शोध सुरु केला आहे.आज दिवसभर सुरु असलेल्या सत्ता संघर्षाच्या नाटकात एक नवीन वळण आले असून शहापूर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यामान आमदार दौलत दरोडा यांच्यासोबत संपर्क होत नसल्याचे त्यांचा मुलगा करण दरोडा यांनी पत्रकारांना सांगितले. वडील बेपत्ता असल्याने आमचे कुटंब चिंतेत असल्याचेही सांगत आमदार दरोडा यांचा मुलगा करण आणि मतदारसंघातील कार्यकर्त्यांसह माजी आमदार बरोरांसोबत धाव घेऊन शहापूरचे आमदार दौलत दरोडा हे मतदारसंघातून बेपत्ता झाल्याची तक्रार शहापूर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. आता पोलीस आमदार दरोडा यांचा शोध घेण्यासाठी काय मोहीम राबविणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, आज दुपारपासून राष्टवादीच्या ९ आमदारांच्या दिल्ली जाण्यासाठी विमानाच्या तिकिटांची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यामध्ये आमदार दौलत दरोडा यांचे नाव एक नंबरला होते. यामुळे शहापूर विधानसभा मतदारसंघात एकच खळबळ उडाली आहे.