रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. शिवसेना शिंदे गटाने जिल्ह्यात दबदबा निर्माण केला आहे. एकूण ५९ जागांपैकी शिंदे गटाचे २१ उमेदवार विजयी होऊन हा पक्ष सर्वात मोठा ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे १६, भाजपचे १५, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ५ तर काँग्रेसचे २ सदस्य निवडून आले आहेत. निवडणूक निकालासह सर्व विजयी उमेदवारांची नावे अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून या निकालामुळे जिल्हा परिषदेत सत्तासमीकरण बदलल्याचे स्पष्ट झाले आहे.
रायगडमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सर्वाधिक जागांवर विजय मिळाला असला तरी बहुमतासाठी आवश्यक असलेला ‘जादुई आकडा’ गाठण्यासाठी त्यांना अन्य पक्षांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. त्यामुळेच “मोठा गट शिंदेंचा, सत्ता मात्र अनिश्चित” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्र आले, तर त्यांची एकत्रित संख्या ३१ वर पोहोचते, जी जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी पुरेशी आहे. त्यामुळे भाजप–राष्ट्रवादी युतीची शक्यता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेत आहे. अशी युती प्रत्यक्षात आल्यास सर्वाधिक सदस्य असलेला शिंदे गट विरोधी बाकावर बसण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळेच जिल्ह्यातील राजकारण अधिकच रंगतदार झाले आहे.
दरम्यान, मंत्री भरत गोगावले यांनी शिवसेनेने जिल्ह्यात केलेल्या विकासकामांचा, जनसंपर्काचा आणि संघटनबळाचा दाखला देत आपण नैसर्गिकरित्या सत्तेचे दावेदार असल्याचा ठाम दावा केला आहे. रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी निकालानंतर प्रतिक्रिया देताना पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “जिल्ह्यात आमचे सदस्य मोठ्या प्रमाणात निवडून आले असून याबाबतची सविस्तर माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आली आहे. जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती, संख्याबळ आणि जनतेचा कौल लक्षात घेऊन योग्य तो निर्णय तेच घेतील.”



