राज्य सरकारमध्ये अनेक गॅंग, मालिक यांच्या नंतर सर्वांचे नंबर लागणार – नारायण राणे

0
164

 

सिंधुदुर्ग – महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक गँग आहेत. डी नाही तर बी आणि सी गॅंग सुद्धा आहेत. नवाब मलिक यांच्यानंतर सर्वांचा नंबर लागणार आहे. असे सूचक विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले आहे. संजय राऊत हे शिवसेना संपवण्याचे काम करत आहेत. असा आरोप त्यांनी यावेळी केला. आपल्या दोन्ही घरांवर सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी मालवण येथील नीलरत्न बंगल्याचे पत्रच माध्यमांसमोर दाखवले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी बोलताना राज्य सरकार आणि शिवसेनेवर सडकून टीका केली. नवाब मलिक हे काय बोलत होते, आता त्यांची बोलती बंद झाली असेल. आम्ही हे अनेक दिवस बोलत होतो आणि हे होणारच होतं, नवाब मलिक यांचेच संबंध नाही तर राज्याच्या मंत्रिमंडळात डी काय बी काय सी काय सगळी माणस आहेत आता क्रमाने एक एक आत जाणार. नवाब मलिक यांच्यानंतर नंबर कोणाचा नंबर आहे असे विचारले असता तुम्हाला लवकरच अटक झाल्यानंतर कळेल असे ते यावेळी म्हणाले.
तर नवाब मलिक यांच अनुकरण आपल्या जिल्ह्यातील कोणी करू नये असे म्हणत त्यांनी जिल्ह्यातील आपल्या राजकीय विरोधकांना थेट इशारा दिला आहे. नवाब मलिक काय बोलत होते, आता बोल म्हणा इडी समोर. मग तोंडात देतील बिडी तुझ्या असेही राणे यावेळी म्हणाले.

संजय राऊत यांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली आहे. सर्व अभ्यासकांचा देखील तेच मत आहे. संजय राऊत हे शिवसेना संपविण्यासाठी हे सगळं करतोय अशी टीका देखील राऊत यांच्यावर राणे यांनी यावेळी केली. संजय राऊत सकाळी उठल्यापासून बेजबाबदारपणे बोलतात आणि त्यांच्या बेजबाबदार बोलण्यावर आम्ही काय उत्तर द्यावं त्याची मानसिक स्थिती चांगली नाही. असे म्हणताना हे शेवटचे वाक्य ब्रेकिंग न्यूज करा असेही त्यांनी पत्रकारांना सुचविले

दिशा सालीयाण मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले आम्ही काही तिची बेइज्जती केलेली नाही. तिला ज्याप्रकारे मारण्यात आले अत्याचार करून, ते आम्हाला योग्य वाटत नाही. ज्यांनी मारलं आणि ज्यांनी हे केलं त्यांना शिक्षा व्हावी ही केस दाबण्यात येऊ नये म्हणून आम्ही बोलतोय. आता तिच्या आई-वडिलांना कोण प्रवृत्त करतोय हे देखील आम्हाला माहित आहे. आणि दिशाच जे झालं त्यावेळी तिच्या आई-वडिलांची भूमिका काय होती हे देखील मला चांगलं माहीत आहे. याची माहिती तुम्हीही घ्या आणि नंतर विचारा असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

राणेंचा बंगला तोडण्याची हिंमत कोणात नाही. आता ते तक्रारी करत आहेत. माझं काही इनलीगल नाही. मी सर्व परवानग्या घेतलेल्या आहेत. मुंबईच्या बंगल्याला सर्व परवानग्या मिळाल्यानंतरच मी 2013 सालात त्या ठिकाणी राहायला गेलो आहे. मालवणचे घर देखील सर्व परवानगी घेऊनच बांधलेला आहे. या घराबाबत कोणतीही नोटीस आम्हाला अद्यापही मिळालेले नाही. तरीदेखील ज्या ज्या वृत्तपत्राने आणि वृत्तवाहिन्यांनी या घराच्या बाबतीत बातम्या दाखवल्यात त्यांच्या विरोधात न्यायालयात जाणार. कोणालाही सोडणार नाही असेही ते यावेळी म्हणाले. पत्रकारांनी जखमेवर मीठ चोळण्याचे काम करू नये प्रामाणिक पत्रकारिता करावी असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

आपल्या मुंबईच्या घरात अधिकारी आले त्यांच्या डोळ्यात पाणी आले. साहेब अशा पद्धतीने तुमच्या घरात आम्हाला यावे लागले याचे वाईट वाटते, असेही ते म्हणाले. माझ्या जिल्हावाशीयांच्या डोळ्यात किती पाणी आलं हे मला माहीत नाही. 1983 पासून मी इन्कम टॅक्स भरतो आहे. जाऊद्या हे सुडाचे राजकारण आहे त्यांनी सुरू केले मी शेवट करणार. कोणालाही सोडणार नाही. मी कुणाला घाबरत नाही. मी पुरा 96 आहे असा इशाराचं नारायण राणेंनी ठाकरे सरकारला दिलाय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here