महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर भाजपने शनिवारी सकाळी नाट्यमयरित्या सत्तास्थापनेचा दावा करत, देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या घडामोडीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्याच्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निर्णयाला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीनही पक्षांनी एकत्रितपणे सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. रिट याचिकेवर आज (रविवारी) साडेअकरा वाजता सुनावणी होणार आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाआघाडीकडे १५४ सदस्यांचे संख्याबळ असताना राज्यपालांनी या पाठिंब्याकडे दुर्लक्ष करून फडणवीस आणि पवार यांना शपथ दिली. हा शपथविधी बेकायदा असून ही संपूर्ण प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
राज्यपालांनी फडणवीस यांना बहुमतासाठी ३० नोव्हेंबपर्यंतची मुदत दिली असली तरी बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानसभेचे अधिवेशन तातडीने रविवारीच बोलावले जावे आणि त्या कामकाजाचे चित्रीकरणही केले जावे, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे.