प्रतिनिधी / कोकण
जमीनीला पडलेल्या भेगा आता खोलवर जाऊन संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस थुळवाडी येथील संपूर्ण डोंगरच आता खचू लागला आहे.त्यामुळे येथील झाडे पडू लागली असून एका घरावर झाड कोसळून नुकसान देखील झाले आहे. त्यामुळे फुणगूस थुळवाडी पूर्णतः संकटात सापडली आहे.मात्र प्रशासन अद्यापही हा विषय गांभीर्याने घेण्यास तयार नसून येथील ग्रामस्थां सामोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण भाग असलेल्या फुणगूस खाडी भागातील थुळवाडी येथे काही दिवसांपूर्वीच जमिनीला भेगा पडल्याचे समोर आले होते.या भेगा वाढत जात असून येथील २० ते २२ घरांना धोका निर्माण झाल्याचे समोर येताच काही दिवस उलटल्यानंतर प्रशासनाने या विषयाकडे लक्ष घातले.तहसीलदार संदीप कदम यांनी पाहणी करून भूगर्भशात्रज्ञ याना निमंत्रित करून त्यांनी देखील पाहणी केली होती.आणि येथील ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आले होते.तसेच येथील परिस्थितीचा रोजचा पाहणी अहवाल सादर करण्याचे आदेश येथील तलाठ्यांना देण्यात आले होते.
आता मात्र येथील परिस्थिती अधिक धोकादायक बनली आहे.जमिनीला पडलेल्या भेगा रुंद होऊन अधिक खोलवर गेल्या आहेत.त्यामुळे येथील पूर्ण डोंगरच खचू लागला आहे.दोन ते तीन फुटापर्यंत डोंगर खचण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ती वाढत आहे.कोणत्याही क्षणी हा पूर्ण डोंगर खाली कोसळेल असे स्पष्ट चित्र येथे दिसून येत आहे.एका बाजूला डोंगर खचण्याची प्रक्रिया सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला नवीन-नवीन ठिकाणी भेगा पडून त्या वाढतच निघाल्या आहेत.
डोंगर खचू लागल्याने येथे असलेली झाडे देखील कोसळू लागली आहेत.असेच एक झाड येथील रहिवाशी वसंत थुळ यांच्या घरावर कोसळल्याने त्यांच्या घराची पडवी जमीनदोस्त होऊन मोठे नुकसान झाले आहे.तर शंकर कुलकर्णी यांच्या घराला पडलेल्या भेगा देखील रुंदावल्या असून आजूबाजूच्या परिसराला देखील भेगा पडत आहेत.त्यामुळे शंकर कुलकर्णी यांचे पूर्ण घर आता धोकादायक बनले आहे.
इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना प्रशासन मात्र हा विषय गांभीर्याने घेण्यास तयार नाही.उलट येथील तलाठ्यांनी काही ग्रामस्थांना सही शिक्का नसलेल्या स्थलांतराच्या नोटिसा बजावून त्यांच्या जखमेवर जणू मीठ चोळण्याचा प्रयत्न केला असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.एकूणच थुळवाडी मोठ्या संकटात सापडली असून येथील डोंगर जर पूर्णपणे खचला तर थुळवाडीसह पायथ्याजवळ असलेली गुरववाडी देखील संकटात सापडण्याची श्यक्यता आहे.