प्रतिनिधी / कोकण
गेल्या आठ दिवसांपासून जिल्हयात असणारा पावसाचा ओघ कमी झाला आहे. या कालावधीत सर्वच प्रशासकीय यंत्रणांनी संकटात अडकलेल्यांची सुटका आणि त्यांना सर्वतोपरी मदत दिली. सोबतच आता रोगराई पसरु नये याची खबरदारी घेतली जात आहे. शक्य तितक्या पात्र व्यक्तींना तातडीची मदत प्रशासनाने दिली आहे अशी माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.
जिल्हयात 6 ऑगस्टपर्यंत नोंदल्या गेलेल्या साधारण सरासरी पर्जन्यमानानुसार 2933 मिलीमीटर पाऊस होत असतो. यावर्षी प्रत्यक्षात 3251 मिलीमीटर (107) टक्के पावसाची नोंद झाली. यापैकी जुन महिन्यात सरासरी 817 मिमी असताना 728 मिमी (89) टक्के तर जुलै महिन्यात 2104 सरासरी असताना 2477 मिमी (117)टक्के पावसाची नोंद झाली आहे. जुलै महिन्याच्या प्रारंभी पावसामुळे चिपळूण तालुक्यात तिवरे धरण फुटून भेंदवाडी हे गाव वाहून गेले होते. यासह आतापर्यंत 28 व्यक्तींचा पूरात मृत्यु झाला आहे. इतर अपघात 1 जण मरण पावला. एकूण 29 पैकी पात्र ठरलेल्यांची संख्या 24 असून त्यापैकी 22 जणांच्या वारसांना नैसर्गिक आपत्ती अंतर्गत आर्थिक मदत पुरविण्यात आली आहे.
या पावसात 159 जनावरे वाहून गेली तर 763 घरांचे नुकसान झाले आहे. सर्व मालमत्तेचे आतापर्यंत झालेले नुकसान 10 कोटी 28 लाख रुपये मुल्याचे आहे.
पूर परिस्थितीमुळे 13 गावांमधील 173 कुटुंबातील 617 जणांना स्थलांतरीत करण्यात आले. यासाठी एनडीआरएफ चे 24 जवान तसेच कोस्टगार्ड 80 जवान आणि 4 बोटी व महसूल विभागातील सर्वच स्थरातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. चिपळूण आणि खेड जलमय झाल्याने त्या भागात वेगळया 4 बोटींची मदत होत आहे. याखेरीज तपास व इतर मदत कार्यासाठी टोळकेश्वर येथल एक रडार केंद्र, 7 पाणबुडे आणि 5 स्वंयसेवी संस्थांची मदत प्रशासनाला होत आहे.
26 ठिकाणी जमिनीला भेगा, 7 लघूप्रकल्प धोकादायक
यंदाच्या पावसाळयात चिपळूणमधील वाशिष्टी नदीला पूर आल्याने 10 वेळा तर खेड जवळ जगबुडी नदीला पूर आल्याने 13 वेळा मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद ठेवावी लागली. राजापूर तालुक्यात अर्जुना नदीच्या पूराची पातळी वाढल्याने कोदवली पुलावरील वाहतूक 11 वेळा बंद झाली. जगबुडीची नदीची पातळी 9.5 मीटरपर्यंत वाढल्याची नोंद या काळात झाली. 2016 साली याठिकाणी सर्वाधिक 11.3 मीटर पातळीची नोंद आजवर झाली आहे. सतत मुसळधार पावसामुळे जमिनीला भेगा पडण्याचा घटना या काळात मोठया प्रमाणात घडल्या. गुहागर आणि दापोली तालुके वगळता इतर तालुक्यात 26 ठिकाणी जमिनीला भेगा गेल्याची नोंद प्राप्त झाली आहे. जिल्हयात 3 मोठी धरणे असून ती पूर्णपणे सुरक्षित आहेत तसेच 46 लघूप्रकल्प असून ते सर्व सुरक्षित आहेत. मृदसंधारण अंतर्गत 16 आहेत त्यात 9 पूर्णपणे सुरक्षित असून असुरक्षित वाटणाऱ्या 7 प्रकल्पातील पाणीसाठा कमी करुन त्यांनाही या पातळीवर आणण्याचे काम प्रशासनाने केले.



