कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहे. आतापर्यंत जिल्हय़ातील आयसोलेशनमधील रूग्णांची संख्या 2 ने घटली असून ती 21 वर आली आहे. होम क्वारंटाईनच्या संख्येत दोन दिवसात तब्बल 135 ने वाढ झाली असून ती संख्या शुक्रवारी 700 वर पोहोचली आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संचारबंदी व सीमाबंदीची काटेकोर अंमलबजावणी केली जात असून नियमभंग करणाऱयांविरोधात पोलिसांनी जोरदार मोहीम हाती घेतली आहे.
जिल्हा प्रशासनाने कोरोना परिस्थितीविषयी एक प्रसिद्धीपत्रक काढले आहे. त्यात नमूद केले आहे की, संचारबंदीची अंमलबजावणी रत्नागिरी जिह्यात योग्य प्रकारे सुरु आहे. जिह्याच्या सीमा अन्य जिह्यातील प्रवाशांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. जिह्यातील रुग्णालयात निरीक्षणाखाली असलेल्या रुग्णांची संख्या दोनने घटून 21 एवढी राहिली आहे. यातील 16 व्यक्ती रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात निगराणीखाली आहेत. स्वत:च्या घरातच अलग करण्यात आलेल्या संशयित रुग्णांची संख्या सोमवारी 456 होती ती मंगळवारी 565 पर्यंत व शुक्रवारी तब्बल 135 ने वाढून ती 700 झाली आहे. आहे. पुणे-पिंपरी चिंचवड व मुंबई येथून जिह्यात आलेल्या लोकांची गाववार यादी तयार करण्यात येत आहे. अशा व्यक्तींवर वैद्यकीय विभाग लक्ष ठेवून राहणार आहे. यासाठी जिह्या व तालुका नियंत्रण समित्यांप्रमाणेच नर्स, तलाठी, ग्रामसेवक व शिक्षक यांचा समावेश असलेल्या ग्रामनियंत्रण समित्यांच्या स्थापनेचे काम हाती घेण्यात आले आहे.
बहुतांश उद्योग बंद
रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे, झाडगाव, चिपळूण तालुक्यातील खेर्डी, दापोली येथील औद्योगिक क्षेत्रातील 908 पैकी 897 उद्योग बंद करण्यात आले आहेत. 11 उद्योग तांत्रिक कारणास्तव तसेच अत्यावश्यक सेवांशी संबंधित असल्याने सुरु ठेवण्यात आले आहेत. 22 उद्योगांनी अपरिहार्य कारणास्तव काम सुरु ठेवण्यासाठी परवानगी मागितली असून त्या बाबत आवश्यक निर्देश जिल्हा प्रशासन देणार आहेत. घरीच किराणा माल वितरण करण्यासाठी व्यापारी महासंघाला आवाहन करण्यात आले आहे. ठरवून दिलेल्या विशिष्ट वेळी दुकाने उघडण्याची मुभा दिली जाणार आहे.
मुंबईतून दुचाकीवरून आलेल्यांना पिटाळले
शासकीय आदेशांची पोलिसांकडून कडेकोट अंमलबजावणी सुरू असून जिह्याच्या सर्व बाजूच्या सीमांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चारचाकी वाहनांना बंदी असलेल्या मुंबईतून दोन दुचाकींवरून चौघेजण रत्नागिरीत येत होते. मंगळवारी ते हातखंबा येथे आले असता पोलिसांनी त्याना अडवून चौकशी केली. आपण रत्नागिरीत गावी निघालो असून चारचाकीला बंदी असल्याने दुचाकीचा पर्याय स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले. मात्र पोलिसांनी या दोन्ही गाडय़ांना प्रवेश नाकारत पुन्हा मुंबईला पिटाळले. दरम्यान, न्यायालयात सुनावणीसाठी उपस्थित रा†िहलेले एक वकील जिह्यात परतत होते. मात्र त्यांची गाडी एमएच 08 असल्याने विनतीवरून त्यांना कशेडी घाटातून जिह्यात मोठय़ा मुश्कीलीने प्रवेश देण्यात आला.
जिल्हय़ात 893 ला वाहतूक परवाने
रत्नागिरी जिल्हय़ात आंबा बागायतदार, फळ भाज्या दूध विक्री करणाऱया एकूण 893 जणांना वाहतूक परवाने शुक्रवारी देण्यात आल़े यापैकी आंबा बागायदार 790 फळ भाज्या 98 आणि दुधाच्या 5 गाडय़ांचा समावेश आह़े.