मानकरी मंडळी, गावकरी आणि चाकरमानी यांच्या साथीने कोकणच्या संस्कृतीची अनुभूती देणाऱया शिमगोत्सवाची धूम रत्नागिरी जिल्हाभरात सुरू आहे. गेल्या शुक्रवारपासून तेरसे शिमग्यांना दणक्यात प्रारंभ झाला असताना मंगळवारी भद्रा शिमग्यांची सांगता होईल. सोमवारी सर्वत्र होळय़ा उभारून पौर्णिमेच्या शिमगोत्सवाला जिल्हय़ात जल्लोषात प्रारंभ झाला. ढोल-ताशांचा गजर, फाका व होळय़ा नाचवत गावकऱयांनी अपूर्व उत्साहाचे दर्शन घडवले.
पौर्णिमेच्या शिमग्याला सोमवारी जिल्हय़ात प्रारंभ झाला. गावकरी-मानकरी यांनी होळय़ा उभारून शिमगोत्सवाचा जल्लोष केला. गावागावांमध्ये आता पालखी भेटीचा अविस्मरणीय सोहळा रंगणार आहे. शिमगोत्सवासाठी जिल्हय़ात 1 हजार 243 सार्वजनिक तर 2 हजार 700 खासगी होळय़ा उभ्या राहणार आहेत. फाकपंचमीनंतर 1095 ग्रामदेवतांच्या पालख्या रुपे लावण्याचा कार्यक्रम झाला. त्या-त्या गावांच्या पालख्या ग्रामस्थांच्या दर्शनासाठी बाहेर पडणार आहेत.
रत्नागिरीत शहरातील बारा वाडय़ांचे प्रसिद्ध ग्रामदैवत श्री देव भैरीबुवाचा शिमगोत्सव, मिरजोळे येथील ग्रामदेवता श्री कालिकादेवीचा शिमगोत्सव, खेडशी येथील ग्रामदेवतांचा शिमगोत्सव, शिरगाव येथील आदिष्टीचा, चांदोर येथील नवलाई-पावणाई देवीचा, आगवे येथील रवळनाथ देव, नाखरेची नवलाई-पावणाई देवीच्या शिमगोत्सवाचे कार्यक्रम आजपासून साजरे होणार आहेत. तसेच इतर ठिकाणच्या ग्रामदेवतांचेही शिमगोत्सवाचे सोहळे रंगणार आहेत. शिमगोत्सवाच्या मुख्य कार्यक्रम असलेल्या सहाणेवर देवीच्या होळय़ा फाकांच्या जयघोषात, ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत आणून उभ्या केल्या गेल्या.
गावा-गावांमध्ये चाकरमानी दाखल
कोकणातील सर्वात मोठा सण म्हणून ओळखल्या जाणाऱया शिमगोत्सवासाठी नोकरीधंद्यानिमित्त अन्यत्र असलेले सर्व चाकरमानी गावात दाखल होतात. चाकरमानी व गावकऱयांच्या उत्साहाला शिमगोत्सवाने उधाण आले आहे. प्रत्येक गावात शिमगोत्सवाची प्रथा, परंपरा व साजरा करण्याची पद्धतही वेगळी आहे. ढोल ताशांचा गजर, फाकांच्या आरोळय़ा, होळय़ा वाहून नेण्याचा उत्साह यामुळे संपूर्ण जिल्हय़ात उत्साही वातावरण दिसून येत आहे.



