प्रतिनिधी / रायगड
रत्नागिरी जिल्ह्यात दरोरोज ६० हजार लिटर दुधाची आवश्यकता असते. मात्र, कोल्हापूर, सांगली, सातारा, मिरज इथे भयानक पुरपरिस्थिती झाली आहे. बुधवारी सकाळी रत्नागिरी जिल्ह्यात पूरामुळे कोणत्याच कंपनीचे दुध पोहचू शकले नाही. गोकुळ, वारणा, चितळे, कृष्णा अशा कोणत्याच कंपन्याचे दुध पोहचू शकले नाही. दुधाच्या गाड्या विविध ठिकाणी पुरात अडकल्या आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात दुध वितरण होवू शकले नाही. त्यामुळे दुधासाठी रत्नागिरीकरांना जंगजंग पछाडावे लागत आहे. पुरपरिस्थिती आणखी भीषण झाली, तर उद्या देखील रत्नागिरीकरांना दुध मिळणार नसल्याची भिती व्यक्त केली जात आहे. तसेच रत्नागिरीत पेट्रोल-डिझेल घेऊन येणाऱ्या गाड्या मध्येच अडकल्या असल्याने पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. पंपावर वाहनांच्या रांगा लागल्या दिसत आहेत. सांगली जिल्ह्यातील इंधन डेपोमधून टँकर रत्नागिरी जिल्ह्यात येतात. मात्र, इंधनाच्या गाड्या अडकल्याने रत्नागिरी शहरात सध्या पेट्रोल टंचाई पहायला मिळतेय. पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर सध्या १ ते २ किलोमिटरच्या रांगा पहायला मिळत आहेत. आंबाघाट देखील बंद असल्याने पेट्रोल-डिझेल गाड्या रत्नागिरीत आलेल्या नाहीत. रत्नागिरी शहराला दिवसाला इंधनाची जेवढी गरज आहे त्यातील २० टक्के साठासुद्धा शिल्लक नसल्याने पेट्रोलची मोठी टंचाई निर्माण झाली आहे.