रत्नागिरीत कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खबरदारी म्हणून जिल्हय़ातील बाजारपेठा, बार, टपऱया, हॉटेल्स, धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जाहीर केला आहे. खासगी व सरकारी बससेवाही 23 पासून बंद करण्यात येणार असल्याने जिल्हा लॉकडाऊनच्या दिशेने मार्गक्रमण करू लागल्याचे संकेत आहेत. याचवेळी कोरोनाबाधित रुग्णाचे मूळ गाव शृंगारतळी पूर्णपणे सिल करण्यात आले आहे. पहाटेपासूनच शृंगारतळीला पोलिसांचा वेढा असून गावात वा गावाबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. शृंगारतळी व आजूबाजूच्या परिसरात आरोग्य विभागाकडून शोध, तपासणी मोहीम गतिमान करण्यात आली आहे.
दुबईतून परतलेल्या शृंगारतळी येथील 50 वर्षीय व्यक्ती कोरोना तपासणीमध्ये पॉझिटिव्ह आढळल्याने आरोग्य यंत्रणेसह सर्वच प्रशासन हाय अलर्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हय़ातील सर्व हॉटेल्स, बार, टपऱया बंद करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तीन चार दिवसात एस. टी. सेवाही टप्याटप्याने बंद करण्यात येणार आहे. जिल्हय़ात धार्मिक कार्यक्रमांवर आधीच बंदी घालण्यात आली आहे. या बंदीचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
रुग्णाच्या कुटुंबीयांचे नमुने तपासणीसाठी
शृंगारतळी येथील पॉझिटिव्ह रुग्णाची पत्नी, मुलगा आणि भावाच्या स्वाबचे नुमने चाचणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. कोणालाही शृंगारतळीत जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. प्रशासनाकडून पुढील आदेश येईपर्यंत नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात सध्या 11 संशयित रुग्ण आहेत. आयसोलेशनसाठी जागा अपुरी पडू नये यासाठी जिल्हय़ात 105 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये डेरवण येथील वालावलकर रुग्णालयाचे व अन्य खासगी रुग्णालयांचाही समावेश आहे.