रत्नागिरीत महामार्गाचे तीन वर्षात अवघे 28टक्केच काम!

0
329

 

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणात चिपळुणातील परशुराम ते खेरशेत टप्प्यातील काम गेल्या काही दिवसांपासून पूर्णत: ठप्प आहे. आतापर्यंत अवघे 28 टक्के काम झाले आहे. पावसाळय़ानंतर गेल्या 4 महिन्यांत अवघे 8 टक्केच काम झाले आहे. वाशिष्ठी नदीवरील पुलाचे कामही कासवगतीने होत असल्याने पावसाळय़ापूर्वी तो पूर्णत्वास जाणे अशक्य आहे.

जिल्हय़ात चौपदरीकरणाच्या कामाला प्रथम चिपळूण टप्प्यात प्रारंभ झाला. परशुराम ते खेरशेत या 36 कि.मी.च्या कामाचा ठेका चेतक कंपनीने घेतला असून सुरुवातीला कामाची गती चांगली होती. मात्र त्यानंतर गती मंदावत गेली ती पुन्हा वाढलीच नाही. गेल्या साडेतीन वर्षात 36 कि. मी.पैकी अवघे 8 कि.मी.चेच चौपदरीकरण पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे गत पावसाळय़ानंतर 15 नोव्हेंबरपासून पुन्हा चौपदरीकरणाच्या कामाला सुरूवात झाली, मात्र 9 मार्चपर्यत केवळ 8 टक्केच काम झाले आहे.

‘वाशिष्ठी’चे रडगाणे कायम

चिपळूण शहरासह तालुक्यातील 13 गावांमधून चौपदरीकरण होत आहे. यामध्ये पेढे-परशुराम वगळता उर्वरित ठिकाणी कामे कमी-जास्त प्रमाणात सुरू झाली असली तरी कामाची गती मात्र समाधानकारक नसल्याचे दिसत आहे. गेल्या पावसाळय़ात पूरस्थितीवेळी जुना वाशिष्ठी पूल वारंवार बंद ठेवण्याची नामुष्की आली होती. त्यामुळे चौपदरीकरणातील रखडलेल्या पुलाच्या कामाला गती देऊन पावसाळय़ापूर्वी तो खुला होईल, अशी अपेक्षा होती. मात्र सध्याचे काम पाहता येणाऱया पावसाळय़ातही हा पूल पूर्णत्वास जाईल, याची खात्री नाही. आता तर पुलाचा एकमार्ग पूर्णत्वास जाईल, असे ठेकेदार कंपनी सांगत आहे.

उड्डाणपुलाचा शुभांरभही पुढीलवर्षी

दिवाळीनंतर चिपळूण शहरातील चौपदरीकरण कामाला सुरूवात झाली. शहरात बहादूरशेखनाका ते युनायटेड हायस्कूलपर्यंत उड्डाणपूल आहे. त्यादृष्टीने सेवा रोडचे काम हाती घेण्यात आले. काही ठिकाणी गटारे आणि भिंत उभारणी सुरू केली. मात्र 20 दिवसांहून अधिक काळ शहरातील चौपदरीकरणाचे काम पूर्णपणे बंद पडले आहे. दोन्ही बाजूंच्या सेवा रोडचेच काम होत नसल्याने उड्डाणपुलाच्या कामाला पावसाळय़ानंतरच सुरूवात होण्याची चिन्हे दिसत आहेत.

डेडलाईन हुकणार

महामार्ग चौपदरीकरणात खेड, लांजा, राजापूरसह सिंधुदुर्गातील चौपदरीकरण पूर्णत्वाच्या मार्गावर असताना रखडलेल्या संगमेश्वर, रत्नागिरीच्या टप्प्याच्या जोडीला व चिपळूणही येणार आहे. या टप्प्यात अजून 30 टक्केही काम न झाल्याने रस्ते विकास मंत्रालयाने काम पूर्णत्वासाठी दिलेली डेडलाईन हुकणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here