रत्नागिरीत मतदान यंत्रांच्या बिघाडामुळे खोळंबा; चिपळूणसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी यंत्रे पडली बंद!

0
24

रत्नागिरी- जिल्ह्यातील ५६ जिल्हा परिषद आणि ११२ पंचायत समिती जागांसाठी शनिवारी सुरू असलेल्या मतदानाच्या प्रक्रियेला यंत्रणेतील बिघाडाचे गालबोट लागले आहे. सकाळी ७:३० वाजता उत्साहात मतदानाला सुरुवात झाली असली तरी, जिल्ह्याच्या विविध भागांत मतदान यंत्रे (EVM) वारंवार बंद पडल्याने मोठा गोंधळ उडाला. याचा थेट परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर दिसून आला आहे. विशेषतः चिपळूण तालुक्यात या तांत्रिक बिघाडाचे तीव्र पडसाद उमटले असून, तालुक्यातील तब्बल ४५ मतदान केंद्रांवरील यंत्रे ठप्प झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

चिपळूणमधील खेर्डी जिल्हा परिषद गटातील ४ ते ५ केंद्रांसह शिरगाव, सावर्डे कॉलनी, पिंपळ मोहल्ला, कुडप, गुढेकरवाडी, मांडकी, खरवते, कोंढरताम्हाणे, कापरे, कापसाळ, कळंबस्ते, पेढांबे, पिंपळी, सती-चिंचघरी, कळवंडे आणि मालघर कोंढे यांसारख्या अनेक गावांमध्ये मतदान यंत्रांनी साथ न दिल्याने मतदानाची प्रक्रिया तासनतास रखडली. हीच परिस्थिती दापोलीतील उटंबर आणि खेड तालुक्यातील बोरज येथेही पाहायला मिळाली. रखरखत्या उन्हात ताटकळत उभे राहूनही मशीन सुरू होत नसल्याने मतदारांमध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. तांत्रिक अडचणींमुळे ताटकळत राहण्यापेक्षा अनेक मतदारांनी मतदान न करताच केंद्रावरून माघारी जाणे पसंत केले, ज्यामुळे लोकशाहीच्या या उत्सवात मतदारांच्या निरुत्साहाचे चित्र पाहायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here