रत्नागिरीतील समुद्रात सापडली तब्बल दीडशे किलोची वागळी

0
279

 

सिंधुदुर्ग – रत्नागिरी शहराजवळील काळबादेवी येथील एका मच्छिमाराला आतापर्यंतची सर्वात मोठा सुमारे दीडशे किलोचा वागळी मासा सापडला. विक्रीसाठी नेणाऱ्या छोट्या टेम्पोचा पूर्ण हौद त्या माशाने व्यापला होता. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाघळी समजली जात आहे.

तौक्ते चक्रीवादळ सरून गेलं आणि मासळी समुद्रातून गायब झाली. छोटे मच्छिमार किनाऱ्यापासून काही अंतरावर मिळेल ते मासे पदरात पडून घरी परत येत आहेत. काळबादेवी येथील मच्छिमार संदेश मयेकर मिऱ्यापासून काही अंतरावर तांडेल निकेत मयेकर यांच्यासह ही नौका मासेमारी करत होती. फारसे मासे मिळत नव्हते त्यामुळे ते माघारी फिरले. परत येताना जाळ टाकलं आणि अचानक जाळ्यात मासे लागल्याचे त्यांना जाणवलं. जाळ्याला जड लागल्यामुळे कुतूहल वाढले. जाळ पाण्या बाहेर ओढण्यास सुरुवात केली आणि नौकेतील मच्छिमाराच्या चेहरा फुलून गेला. मासळीची कमतरता असताना वागळी माश्याचा मटकाच हाती लागला होता. भराभर मासा पाण्याबाहेर काढला आणि ते किनाऱ्यावर धावले. एवढा मोठा मासा विक्रीला न्यायचा म्हणजे गाडीशिवाय पर्याय नव्हता. छोटा टेम्पो मागवला. आकाराने मोठी असलेली वागळी त्या गाडीच्या हौदात टाकली. पूर्ण जागा त्या एका माशाने भरून गेली होती.

मिऱ्या येथील काही लोकांनी तो मासा विकत घेतला. सुमारे 150 किलोचा हा मासा 6 फूट बाय 7 फुटाचा असावा. सध्या कोरोनामुळे दर कमी असल्यामुळे त्याला थोडी कमी किंमत मिळाल्याची चर्चा होती. मात्र, एवढा मोठा मासा प्रथमच रत्नागिरीच्या किनारी सापडल्याचे मच्छिमारांनी सांगितले. या माशाला बाजारात किलोला 170 रुपये दर मिळतो. या माशाला चांगली मागणी आहे. दरम्यान, आठवड्यापूर्वी तौक्ते चक्री वादळामुळे समुद्र खवळला होता. त्यामुळे हा मासा किनाऱ्यावर आला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here