सिंधुदुर्ग – अवेळी पडलेला पाऊस व बदलत्या हवामानाचा फटका यावर्षी हापूसला मोठ्या प्रमाणात बसल्याने आंबा पीक कमी आले होते. त्यातही दिलासादायक बाब म्हणजे, यावर्षी 974 हून अधिक टन आंब्याची परदेशात निर्यात झाली आहे. त्यातही अमेरिकेत सर्वाधिक 806 टन आंबा गेला असून, उत्पादकाला याचे चांगले दर मिळाले आहेत.
कमी आंबा असूनही गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी हापूस निर्यातचे प्रमाण वाढले आहे. गतवर्षी 576 टन आंब्याची निर्यात झाली होती. यावर्षी 974.89 टन इतकी निर्यात 23 जूनपर्यंत झाल्याची माहिती पणन मंडळाकडून मिळली. यामध्ये जपानला 41.64 टन, न्यूझीलंडला 86.26 टन, दक्षिण कोरियाला 3.88 टन, युरोपियन देशांना 8.60 टन, तर अमेरिकेत सर्वाधिक 806 टन इतकी हापूसची निर्यात करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वाशी येथील निर्यात सुविधा केंद्रातून ही निर्यात करण्यात आली. हापूसप्रमाणेच केसर, बैगनपल्ली या आंब्याच्या निर्यातीत वाढ झाली आहे.
पणन मंडळाच्या वतीने वाशी येथे अत्याधुनिक निर्यात केंद्राची सुविधा निर्माण करण्यात आली असून, देशभरात उत्पादित होणार्या आंब्याची याठिकाणाहून निर्यात केली जात आहे. वाशी बाजारात येणार्या आंब्यातील दर्जेदार आंबा निवडून निर्यात करण्यात येतो.