सिंधुदुर्ग – लहरी आणि सतत बदलणाऱ्या हवामानाचा मोठा फटका यंदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू पिकाला बसला आहे. गेल्या दीड ते दोन महिन्यांच्या थंडीमुळे कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात काजूच्या बागा मोहोराने बहरल्या होत्या. त्यामुळे यंदा भरघोस उत्पादन होईल, अशी आशा काजू उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. मात्र अति थंडी, त्यानंतरचे ढगाळ व दमट वातावरण आणि हवामानातील अस्थिरतेमुळे ही आशा आता मावळताना दिसत आहे.
नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत पावसाचा प्रभाव कायम राहिला. त्यानंतर थंडीला सुरुवात झाली. नोव्हेंबरच्या अखेरीपासून ते डिसेंबर अखेरपर्यंत कडाक्याची थंडी पडली. या थंडीमुळे काजू मोठ्या प्रमाणात मोहोरला. अनेक झाडांवर पानांपेक्षा मोहोर अधिक दिसून आला. अनेक वर्षांनंतर इतका भरघोस मोहोर आल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
मात्र काजूच्या फळधारणेसाठी आवश्यक असलेले स्थिर व संतुलित हवामान यंदा लाभले नाही. अति थंडीमुळे परागीकरणावर मर्यादा आल्या. काजूच्या झाडांवर नर फुलांचे प्रमाण वाढले, तर मादी फुलांचे प्रमाण घटले. परिणामी फळधारणा अत्यल्प प्रमाणात झाली असून गेल्या दीड महिन्यापासून झाडांवर केवळ मोहोरच दिसून येत आहे.
गेल्या काही वर्षांपासून हवामानातील बदलांचा काजू पिकावर सातत्याने परिणाम होत आहे. ढगाळ वातावरण, वाढती आर्द्रता, अवकाळी पाऊस आणि वादळी वारे यामुळे बुरशीजन्य रोग, फुलकिडे आणि अळ्यांचा प्रादुर्भाव वाढत आहे. पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार फवारण्या कराव्या लागत असून उत्पादन खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
आंब्यानंतर काजू हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अर्थकारणाचे महत्त्वाचे पीक आहे. मात्र भरघोस मोहोर असूनही फळधारणा न झाल्याने यंदाही काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या हाती निराशाच येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.



