सिंधुदुर्ग – महापुराने चिपळूण वर अस्मानी संकट कोसळलं आहे. या दुर्घटनेच्या दुसऱ्याच दिवसापासून माजी खासदार निलेश राणे चिपळूण मध्ये तळ ठोकून आहेत.
स्वतःची पदरमोड करून पूरग्रस्तांना धीर देण्याचं काम त्यांच्याकडून सुरू असून या निःस्वार्थी मदत कार्याबद्दल त्यांचे कनिष्ठ बंधू आमदार नितेश राणे यांनी निलेश राणेंचे कौतुक केले आहे.
मोठा भाऊ निलेश राणेंचा मला खूप खूप अभिमान वाटत असल्याचे ट्विट आ. राणे यांनी केले आहे.
महापुरात चिपळूण गावाला मोठा तडाखा बसला असून येथील घराघरात पुराचे पाणी शिरून नागरिकांचा अन्न, वस्त्र, निवाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
व्यापारी वर्ग तर देशोधडीला लागला आहे. चिपळूण वर कोसळलेल्या या अस्मानी संकटाची माहिती मिळताच भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे चिपळूणकडे येणारे मार्ग बंद असतानाही सर्व संकटांवर मात करून याठिकाणी पोहोचले.
त्यांनी आपल्या सोबत आणलेले साहित्य संकटात सापडलेल्या चिपळूणकरांना देऊन त्यांना धीर देण्याचे काम ते अखंडपणे दिवसरात्र करत आहेत.
त्यांच्या या निःस्वार्थी कार्याबद्दल त्यांचे कनिष्ठ बंधु आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवर निलेश राणेंचे बंधू म्हणून आपणाला खूप अभिमान वाटत असल्याची भावना व्यक्त केली आहे.