मुंबईच्या महापौरपदी रितू तावडेंची वर्णी, तर उपमहापौरपदी शिंदे गटाचे संजय घाडी विराजमान

0
37

मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात तब्बल २९ वर्षांनंतर मोठी उलथापालथ पाहायला मिळाली असून, भाजपच्या रितू तावडे यांची मुंबईच्या महापौरपदी वर्णी लागली आहे. त्यांच्या सोबतीला उपमहापौर म्हणून शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय घाडी यांची निवड करण्यात आली असून, घाडी यांचा कार्यकाळ सव्वा वर्षांचा असणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महापौरपदासाठी अनेक नावांची चर्चा सुरू होती, मात्र सर्व शक्यतांना पूर्णविराम देत आज रितू तावडे यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले.

या निवडीनंतर आपली पहिली प्रतिक्रिया देताना रितू तावडे यांनी अत्यंत नम्र भूमिका मांडली. त्या म्हणाल्या की, “जरी माझी निवड महापौर म्हणून झाली असली, तरी मी स्वतःला मुंबईची सेवक समजूनच काम करणार आहे. मुंबईच्या हितासाठी सर्व नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे सभागृहाची प्रतिष्ठा राखून आणि सर्व पक्षभेद विसरून मुंबईकरांच्या कल्याणासाठी प्रत्येकाने प्रामाणिकपणे काम करावे, अशी माझी अपेक्षा आहे.”

रितू तावडे यांचा राजकीय प्रवास अत्यंत प्रभावी राहिला आहे. भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्या आणि प्रभाग क्रमांक १३२ च्या नगरसेविका म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. मुंबई महापालिकेत दोन टर्म नगरसेविका म्हणून काम करण्याचा त्यांना अनुभव असून, यापूर्वी त्यांनी शिक्षण समितीचे अध्यक्षपद आणि स्थापत्य समितीचे उपाध्यक्षपद यशस्वीपणे सांभाळले आहे. घाटकोपरमधील गुजराती बहुल पट्ट्यात एक आक्रमक ‘मराठी चेहरा’ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. विशेषतः वीज दरवाढीविरोधातील आंदोलनांमुळे त्या प्रकाशझोतात आल्या होत्या.

केवळ पदे भूषवणे नव्हे, तर जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या नेत्या म्हणून त्यांची ख्याती आहे. महिलांच्या अस्मितेचा प्रश्न असो वा अश्लील जाहिरातींविरोधातील लढा, रितू तावडे नेहमीच अग्रभागी राहिल्या आहेत. त्यांच्या एका आंदोलनाची दखल चक्क ‘बीबीसी लंडन’नेही घेतली होती. याशिवाय, पालिका शाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी ‘पोक्सो’ कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी लावून धरली होती. घाटकोपरमधील पाणी टंचाईसाठी त्यांनी काढलेला ‘हंडा मोर्चा’ प्रशासनाला हलवणारा ठरला होता. सामाजिक क्षेत्रातही ‘मराठा प्रतिष्ठा’ संस्था आणि ‘माविम’च्या माध्यमातून त्यांनी हजारो महिलांना रोजगाराशी जोडण्याचे मोठे कार्य केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here