सिंधुदुर्ग – मराठ्यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी ६ जून नंतर आंदोलनाचा इशारा मी दिला आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलनासाठी बाहेर न पडता कोरोना योद्धा म्हणून बाहेर पडण्याचा सल्ला मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. मात्र मी पूर्वीपासूनच मराठा समाजाचा योद्धा म्हणून काम करत असून ६ जून पासून सुरू होणारे आमचे आंदोलन थांबवायचे असेल तर मुख्यमंत्र्यांकडे आम्ही केलेल्या ५ मागण्यांबाबत त्यांनी ६ जून पूर्वी निर्णय घ्यावा, अशी प्रतिक्रिया खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी मालवण मध्ये पत्रकारांशी बोलताना दिली.
तौक्ते चक्रीवादळात किल्ले सिंधुदुर्गच्या झालेल्या पडझडीची पाहणी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सोमवारी मालवणला भेट दिली. मात्र समुद्र खवळलेला असल्याने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी त्यांना आतमध्ये न जाण्याची विनंती केली. त्यामुळे त्यांनी बंदर जेटी वरूनच छत्रपती शिवाजी महाराजांना दंडवत घातलं. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, तौक्ते वादळामुळे किल्ल्यात काही ठिकाणी पडझड झाली आहे. मंदिरावरही झाड कोसळलं असून मंदिराच्या दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा परिषदेमार्फत प्रयत्न सुरू आहेत. मात्र कुठेही निधीची कमतरता भासल्यास खास बाब म्हणून रायगड प्राधिकरणाचा निधी किल्ले सिंधुदुर्गसाठी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.
छत्रपती संभाजी राजे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने मालवणच्या बंदर जेटीवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्वतः पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे याठिकाणी उपस्थित होते. दरम्यान, सायंकाळी समुद्रातील परिस्थिती चांगली झाल्यास किल्ल्यावर जाण्याचा आपला प्रयत्न असेल, असे यावेळी छत्रपती संभाजी राजे म्हणाले.