मालेगाव महानगरपालिकेचे नवनियुक्त उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी आपल्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावल्याने शहरात नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. शिंदेसेना आणि स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांनी या कृत्याचा तीव्र निषेध केला असून, हा फोटो तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे मालेगावच्या राजकीय वर्तुळात सध्या शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.
उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांच्या दालनातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यात त्यांच्यापाठी टीपू सुलतानाचा फोटो लावल्याचे दिसत आहे. त्यानंतर, शिंदेसेनेचे गटनेते नीलेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला. उपमहापौरांच्या दालनातून टिपू सुलतानाचा फोटो हटवण्यासाठी त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांसह आयुक्त कार्यालय गाठले. “जोपर्यंत हा फोटो हटवला जात नाही, तोपर्यंत आमचा निषेध सुरूच राहील आणि तो अधिक तीव्र केला जाईल,” असा इशारा नीलेश आहेर यांनी दिला आहे.
मालेगाव उपमहापौरांचे स्पष्टीकरण, त्या काय म्हणाल्या?
या वाढत्या वादावर उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी टिपू सुलतानचे समर्थन करताना म्हटले की, “मी पदाचा कार्यभार स्वीकारला तेव्हा युतीतील नेत्यांनी मला हा फोटो भेट दिला. टिपू सुलतान हे देशाचे पहिले स्वातंत्र्यसैनिक होते, ज्यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला. त्यांचे कौतुक केवळ भारतानेच नाही, तर ब्रिटननेही केले आहे. ते क्षेपणास्त्राचे शोधक होते आणि त्यांच्या काळात त्यांनी प्लास्टिक सर्जरीचाही पायंडा पाडला होता. आम्ही धर्मनिरपेक्ष लोक आहोत आणि हा फोटो लावण्यात मला काहीही गैर वाटत नाही.”
मालेगाव महानगरपालिकेत सध्या सेक्युलर फ्रंट इस्लाम पार्टी, समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्या युतीची सत्ता आहे. इस्लाम पक्षाचे रशीद शेख हे महापौर असून समाजवादी पक्षाचे शान-ए-हिंद हे उपमहापौर आहेत. या वादामुळे आता महापालिकेतील सत्ताधारी युती आणि विरोधक आमनेसामने आले आहेत.



