कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता आरोग्य यंत्रणा दक्ष झाली आहे. मालवण तालुक्यातील एका गावात दुबईतून आलेल्या युवकाची आरोग्य तपासणी मालवण ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. या युवकाची प्रकृती ठणठणीत असल्याने त्याच्या रक्ताचे नमुने नॉर्मल आले आहेत. तरीही खबरदारी म्हणून स्थानिक आरोग्य विभागाला त्या युवकाच्या प्रकृतीवर आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांनी दिली.
मालवण तालुक्यातील अनेक युवक सध्या दुबईमध्ये नोकरीनिमित्त कार्यरत आहेत. काही तरुण दुबईतून आपल्या गावी आले आहेत. अशा तरुणांची आरोग्य तपासणी होणे आवश्यक असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आल्याने त्यादृष्टीने तपासणी सुरू करण्यात आली आहे. यात एक युवक दुबईतून आपल्या गावी आल्याची माहिती मिळताच त्याची आरोग्य तपासणी करण्यात आली. आता पुढील 14 दिवस तो आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखाली राहणार आहे. त्या युवकाची प्रकृती ठिक असून तो आपल्या घरीच राहणार आहे, असेही वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांनी स्पष्ट केले.
विदेशी पर्यटकांची तपासणी व्हावी
मालवण शहरात सध्या मोठय़ा प्रमाणात गोवा राज्यातून विदेशातील पर्यटक येत असतात. यामुळे या विदेशी पर्यटकांची तपासणी सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या प्रवेशद्वारावर होणे आवश्यक आहे. जेणेकरून कोरोना विषाणूचा धोका टाळणे शक्य होणार आहे, असे मत व्यक्त होत आहे.