मालवण मसुरे गावात शेकडो एकर जमिनीवर दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांची नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

0
332

 

सिंधुदुर्ग – गेले पंधरा दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाने मसुरेसह लगतच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. रमाई व गडनदी किनाऱयाची भात शेती पूर्णत: पाण्याखाली राहिल्याने लावणीसाठी काढलेली रोपे सुकून गेली आहेत, काही भागात केलेली भात लावणी कुजून गेली आहे. त्यामुळे आर्थिक नुकसानी बरोबरच दुबार लावणीचे संकट या भागातील शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याची मागणी मागवणे, मेढावाडी, मर्डेवाडी, वेरली आदी भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.

बागायत, वेरली व मसुरे या गावातून वाहणारी रमाई नदी झाडेझुडुपे व गाळांनी भरून गेली आहे. उन्हाळ्य़ात पाण्याअभावी कोरडी पडणारी ही नदी पावसाळ्य़ात मात्र थोडय़ाशा पावसानेही भरून जाते व पात्र सोडून वाहू लागते. रमाई नदीचे पात्र कावावाडी येथे गडनदीस मिळते, तर दुसरी उपनदी खाजणवाडी मार्गे हुरास येथे गडनदीला मिळते. खाजणवाडी येथील पक्का बंधारा झाला असून या बंधाऱयांची झडपेही काही प्रमाणांत पाण्याचा विसर्ग होण्यास अडथळा ठरतात.

गेले पंधरा दिवस रमाई नदी किनाऱयावरील बागायत, वेरली या गावांसह मसुरे गावच्या मार्गाचीतड, देऊळवाडा, मर्डे, मागवणे, मेढा, गडघेरा, कावावाडी आदी भागात मोठय़ा प्रमाणात पुराचे पाणी घुसले होते. शेकडो एकर भात शेती पाण्याखाली गेली होती. भात लावणीची कामे सुरू असतानाच पूर आल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतीत काढून ठेवलेली रोपे वाहूनही गेली होती. तर काही शेतकऱ्यांनी सुरक्षित जागी आणून ठेवलेली रोपे अद्याप पाणी कमी न झाल्याने कुजून जाऊ लागली आहेत. पावसाच्या संततधारेने शेतीच्या कामाचे मुख्य दिवस वाया गेले आहेत. त्यातच मागवणे, देऊळवाडा भागात लावणी करून झाल्यानंतर पुराचे पाणी रोपांच्यावर राहिल्याने ही रोपे कुजून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱयांसमोर आता दुबार लावणीची वेळ आली आहे. यासाठी केलेले श्रम वाया जाण्याबरोबरच यांत्रिक नांगरणी भाडे, बियाणे खर्च आदींसाठी केलेला खर्च वाया गेल्याने आर्थिक संकट येथील शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. पावसाचा जोर आता कमी झाला असला, तरी काही भागात पाणी अजूनही साचून असल्याने शेतकऱ्यांना सध्या तरी नुकसान सोसून पाणी ओसरण्याची वाट पाहवी लागणार आहे. शासनाने तातडीने या भागातील शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here