सिंधुदुर्ग – मालवणचा अष्टपैलू खेळाडू व गोलंदाजीतील स्पीडस्टार दर्शन बांदेकर याची मुंबई इंडियन्सच्या ३५ जणांच्या चमूत निवड झाली आहे. आयपीएलमध्ये दुबईत मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना नेटमध्ये फलंदाजीचा सराव देण्यासाठी दर्शन बांदेकर या वेगवान गोलंदाजीची निवड करण्यात आली आहे. २१ ऑगस्ट रोजी दर्शन मुंबई इंडियन्सच्या चमूसह दुबईला प्रयाण करणार आहे. दर्शनच्या गौरवास्पद कामगिरीबद्दल क्रीडा रसिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
दर्शन बांदेकर हा मूळ मालवण देवबाग येथील रहिवासी आहे. दर्शनच्या आई-वडिलांचा मासेमारीचा व्यवसाय आहे. दर्शन बांदेकरचे शालेय शिक्षण तेथील डॉ. दत्ता सामंत इंग्शिल स्कूल येथे झाले. त्यानंतर त्याने अकरावी व बारावीचे शिक्षण नाशिक येथे पूर्ण केले. दर्शनला लहानपणापासून क्रिकेटची आवड आहे. वयाच्या आठव्या वर्षापासून त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. वेगवान गोलंदाजी व आक्रमक फलंदाजीसाठी दर्शन बांदेकर ओळखला जातो. दर्शनने लहानपणापासून फलंदाजी व गोलंदाजीवर लक्ष केंद्रीत केले होते. शालेय शिक्षण सुरू असताना तो वेगवान गोलंदाजीवर भर द्यायचा. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर तो गोलंदाजीच्या सरावासाठी नाशिक येथे गेला. नाशिक येथे प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्याने दोन वर्षे गोलंदाजीचा कसून सराव केला. त्यानंतर पुणे येथे भारताचे माजी वेगवान गोलंदाज पांडुरंग साळगावकर यांच्या प्रशिक्षण शिबिरात त्याने एक महिना गोलंदाजीचे प्रशिक्षण घेतले.
दर्शन बांदेकर वेगवान गोलंदाजी करायचा. देवबाग येथे दर्शनला क्रिकेट खेळताना सांगली येथील कोच मकरंद ओक यांनी पाहिले. त्यावेळी ओक यांना दर्शनचे टॅलेंट लक्षात आले होते. त्यांनी दर्शनशी संपर्क साधला आणि त्याला लेदरबॉल क्रिकेटकडे वळण्यास सांगितले. त्यानंतर दर्शनची क्रिकेट कारकिर्द बहरत गेली. दर्शन बांदेकर हा अष्टपैलू खेळाडू आहे. दर्शन ज्या वेगाने गोलंदाजी करतो, त्याच वेगाने चेंडू सीमापार टोलवतो. लांब षटकार मारणे ही दर्शनची खासीयत आहे. जिल्हय़ातील क्रिकेट स्पर्धांमध्ये दर्शनने लांब षटकार मारून फलंदाजीतील कौशल्यही सिद्ध केले आहे. त्याचे क्षेत्ररक्षणातील कौशल्यही वाखाणण्याजोगे आहे. फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर दर्शन सर्वोत्तम आहे.