‘माझ्या हत्येचा कट रचला जातोय’, मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक आरोप

0
3

मंगळवेढा: “मी मराठा आरक्षणासाठी लढत असल्यामुळे माझ्या हत्येचा कट रचला जात असून, त्यासाठी आपल्याच लोकांचा वापर करून सुपाऱ्या दिल्या जात आहेत,” असा खळबळजनक आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मंगळवेढा तालुक्यातील माचनूर येथे शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या या विधानाने संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे.

जरांगे पाटील पुढे म्हणाले की, माझ्याविरोधात काही लोकांना बोलतं केलं जात आहे, मात्र जोपर्यंत राज्यातील मायबाप जनता माझ्यासोबत आहे, तोपर्यंत मला काहीही होणार नाही. जर सरकारने आरक्षण दिले नाही, तर निवडणुकीत एका एकाला पाहून घेईन, असा थेट इशाराही त्यांनी यावेळी दिला. राजकारण हे केवळ निवडणुकीपुरते मर्यादित ठेवा आणि त्यानंतर शेतात कष्ट करा, असा सल्ला देतानाच त्यांनी समाजाला आपल्या मुलांना मोठे अधिकारी बनवण्याचे आवाहन केले. “आपली मुलं अधिकारी झाली तर पुढची ५० वर्षे आपली चिंता मिटेल आणि कुणाच्या दारासमोर सहीसाठी जावे लागणार नाही,” असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
पश्चिम महाराष्ट्रात गॅझेटिअरसाठी एल्गार

सातारा संस्थान, मिरज आणि कोल्हापूर संस्थानचे गॅझेटिअर लागू करण्यासाठी आता पश्चिम महाराष्ट्रात लढा तीव्र करणार असल्याचे जरांगे यांनी जाहीर केले. “पुढच्या महिन्यात सोलापूरमध्ये पहिली बैठक घेतली जाईल. सातारा संस्थानच्या गॅझेटिअरमध्ये १५ लाख नोंदी आहेत, ज्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे ४२ लाख मराठा बांधवांना आरक्षणाचा फायदा होऊ शकतो. सरकारने हे गॅझेटिअर लागू न केल्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवरच आंदोलन करणार,” असा इशारा त्यांनी दिला. तसेच सारथी संस्था आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या प्रश्नावरही लवकरच मोठे आंदोलन उभे करावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here