महाविद्यालयीन परीक्षा होणारच, उच्च-तंत्रशिक्षण मंत्र्यांचं स्पष्टीकरण

0
267

 

कोणत्याही परिस्थितीत महाविद्यालयीन परीक्षा होणारच, असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे. दहावीचा भूगोल विषयाचा पेपर आणि अकरावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतल्याने महाविद्यालयीन परीक्षाही रद्द झाल्या अशा प्रकारचे संभ्रमाचे वातावरण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

कुठलीही महाविद्यालयीन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने घेतलेला नाही. यासाठी चार कुलगुरुंची कमिटी केलेली आहे. या कमिटीतून जी शिफारस येईल त्यानंतर यासंबंधी निर्णय होईल. अगदीच ‘कोरोना’मुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली, तर भविष्यातील परीक्षा कशा घ्यायच्या याचा निर्णय घेतला जाईल. मात्र सध्यातरी कुठल्याही परिस्थितीत महाविद्यालयीन परीक्षा होणार आहेत, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.

‘कोरोना’मुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलेला एसएससीच्या विद्यार्थ्यांचा दहावीचा भूगोलचा पेपर रद्द करण्यात आला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात काल घोषणा केली. 21 मार्चला इतिहास आणि नागरिकशास्त्र विषयाचा पेपर झाला होता, मात्र 23 मार्चला नियोजित भूगोलाचा पेपर रद्द झाला होता.

‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन वाढवल्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. यासोबतच नववी आणि अकरावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. आधीचे सरासरी मार्क लक्षात घेत संबंधित विद्यार्थ्यांना गुण दिले जाणार आहेत. याआधी, शिक्षण विभागाने पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांची पुढील इयत्तेत वर्णी लागली होती. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल आधीच्या विषयांच्या गुणानुसार दिले जातील. मात्र शाळा-महाविद्यालय बंद असल्याने हे निकाल लांबण्याची चिन्हे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here