मुंबई – राज्यातील नऊ महानगरपालिकांमध्ये शुक्रवारी पार पडलेल्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजप) निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. या नऊ शहरांपैकी नागपूरसह ८ शहरांत भाजपने सत्ता काबीज केली, तर एका महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आपला महापौर निवडून आणण्यात यशस्वी ठरला.
नऊपैकी ५ महानगरपालिकांमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाची निवड बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत एमआयएमच्या भूमिकेची मोठी चर्चा झाली. अमरावतीत एमआयएमच्या एका नगरसेविकेने महायुतीच्या उमेदवाराला मतदान केले, तर उर्वरित ११ नगरसेवक तटस्थ राहिले. नागपूरात एमआयएमच्या सहा नगरसेवकांनी तटस्थ राहणे पसंत केले. सोलापूरात एमआयएमने आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे तिथे निवडणूक बिनविरोध झाली.
पुणे विभागातील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचे पूर्ण वर्चस्व पाहायला मिळाले. येथे महापौरपदी रवी लांडगे तर उपमहापौरपदी शर्मिला बाबर यांची निवड झाली आहे. कोल्हापूरमध्ये भाजपने जनसुराज्य शक्ती पक्षासोबत युती करत सत्ता राखली असून, तेथे महापौरपदी रूपाराणी निकम (भाजप) आणि उपमहापौरपदी अक्षय जरग (जनसुराज्य) यांची वर्णी लागली आहे. सोलापूर महानगरपालिकेत विनायक कोंड्याल महापौर तर ज्ञानेश्वरी देवकर उपमहापौर झाल्या असून, हे दोन्ही नेते भाजपचे आहेत.
उत्तर महाराष्ट्रात नाशिकमध्ये भाजपने शिंदेसेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली आहे. नाशिकच्या महापौरपदी हिमगौरी आडके (भाजप) तर उपमहापौरपदी विलास शिंदे (शिंदेसेना) यांची निवड करण्यात आली आहे. जळगावमध्येही हेच समीकरण पाहायला मिळाले, जिथे महापौरपदी दीपमाला काळे (भाजप) आणि उपमहापौरपदी मनोज चौधरी (शिंदेसेना) विराजमान झाले आहेत. धुळे महानगरपालिकेत मात्र भाजपने दोन्ही पदे आपल्याकडेच ठेवली असून, माया परदेशी यांची महापौर तर ज्योत्स्ना पाटील यांची उपमहापौर म्हणून निवड झाली आहे.
अहिल्यानगर (नगर) महानगरपालिकेत महायुतीने वेगळे समीकरण मांडले असून, येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) ज्योती गाडे यांना महापौर पदाची संधी देण्यात आली आहे, तर भाजपचे धनंजय जाधव उपमहापौर झाले आहेत. विदर्भात नागपूर महानगरपालिकेत भाजपने आपले वर्चस्व कायम राखत नीता ठाकरे यांना महापौर तर लीला हाथीबेड यांना उपमहापौर पदाची जबाबदारी दिली आहे. अमरावतीमध्ये भाजपने अपक्ष आणि मित्रपक्षांना सोबत घेतले असून, येथे श्रीचंद तेजवानी (भाजप) महापौर तर युवा स्वाभिमान पक्षाचे सचिन भेंडे उपमहापौर झाले आहेत.



