महाराष्ट्रात एप्रिलमध्ये मतदार याद्यांचे ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’; आयोगाच्या सूचना

0
5

मुंबई : भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्या मध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) प्रक्रिया एप्रिल महिन्यात राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत मतदार याद्यांची सखोल तपासणी करून आवश्यक दुरुस्त्या करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण मोहिरे यांनी याबाबत माहिती दिली.

देशभरात या प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून विरोधी पक्षांकडून तीव्र आक्षेप घेतले जात आहेत. Bihar मध्ये सर्वप्रथम ही प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यावेळी लाखो मतदारांची नावे याद्यांतून वगळल्याचा आरोप झाला होता. तसेच Mamata Banerjee यांनीही या प्रक्रियेला उघड विरोध दर्शविला आहे.

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ३ डिसेंबर २००२ ची मतदार यादी आधारभूत मानली जाणार असून ३० ऑक्टोबर २०२४ च्या विधानसभा मतदार यादीला अंतिम संदर्भ यादी म्हणून स्वीकारले जाणार आहे. दोन्ही याद्यांमध्ये मतदाराचे नाव असल्यास संबंधिताला फक्त एक अर्ज नमुना भरावा लागणार आहे.

मात्र, २०२४ च्या यादीत नाव नसलेल्या मतदारांच्या बाबतीत त्यांच्या आई-वडिलांपैकी किमान एका व्यक्तीचे नाव २००२ च्या मतदार यादीत असणे आवश्यक राहणार आहे. त्यासाठी रहिवासी पुरावा सादर करावा लागेल. दोन्ही याद्यांमध्ये नाव नसल्यास सुनावणी घेऊन संबंधित मतदाराचे नाव वगळण्याची प्रक्रिया केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

याशिवाय मतदार याद्यांमधील अस्पष्ट फोटो, दुबार नावे, चुकीचा पत्ता, लिंग किंवा फोटोतील त्रुटी शोधून त्या दुरुस्त करण्याच्या सूचनाही आयोगाने दिल्या आहेत.

दरम्यान, ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आयोगाने सुमारे दीड महिन्याची मुदत दिली असली तरी प्रत्यक्ष कामासाठी सुमारे दोन महिने लागू शकतात, अशी माहिती प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here