महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये पडणार पाऊस, ही आहेत कारणे

0
5

फेब्रुवारी महिना संपत असताना राज्यात हवामानात मोठे बदल होत आहेत. एकीकडे गारपीट तर दुसरीकडे अति उष्णता यामुळे लोक हैराण झाले आहेत. एकीकडे मुंबईसह किनारपट्टीवर तापमानाचा पारा चढत असताना, दुसरीकडे राज्याच्या काही भागात पावसाळी वातावरण तयार झाले आहे.
स्कायमेटने दिलेल्या ताज्या अपडेटनुसार, वाढत्या तापमानामुळे आता प्री-मान्सून सारखी स्थिती निर्माण होत असून, काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानुसार, दक्षिण मध्य प्रदेशापासून ते महाराष्ट्राच्या काही भागांपर्यंत ढगांची दाटी पाहायला मिळत आहे. विशेषतः विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्राला लागून असलेल्या पट्ट्यात ढगांचे प्रमाण वाढले आहे.

तापमान वाढल्यामुळे जमिनीतील बाष्प वर जाऊन गरजणारे ढग तयार होत आहेत, त्यामुळे अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात गोंदिया, गडचिरोली आणि लगतच्या भागात आधीच पावसाचा शिडकावा झाला आहे. येत्या २४ तासांत विदर्भाच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडू शकतो.

मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये कडक उन्हाच्या झळांसोबतच दुपारनंतर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सध्या पावसाची शक्यता नाही.

मात्र, या भागात उष्णता आणि दमटपणा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सकाळी आणि रात्री थोडा गारवा असला तरी, दुपारच्या वेळी अंगाची लाहीलाही होत आहे. इथे पावसापेक्षा ‘उन्हाचा तडाखा’ अधिक जाणवणार असल्याचं हवामान तज्ज्ञ महेश पलावत यांनी सांगितलं.

हवामान तज्ज्ञ महेश पालावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, उन्हाचा कडाका वाढल्याने स्थानिक पातळीवर लो प्रेशर तयार होऊन गरजणारे ढग तयार होत आहेत. ओडिसा आणि छत्तीसगडच्या परिसरात असलेल्या हवेच्या सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहेत. उत्तर भारतात एक नवा वेस्टर्न डिस्टर्बन्स धडकला आहे. त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रावर होणार नसला तरी, वाऱ्यांच्या दिशेत होणाऱ्या बदलांमुळे राज्यात ढगाळ वातावरण तयार होत आहे.

२६ आणि २७ फेब्रुवारी दरम्यान उत्तर भारतात हिमालयीन पट्ट्यात पाऊस आणि बर्फवृष्टी होईल, तर दक्षिण भारतात केरळ आणि कर्नाटकात पाऊस सक्रिय असेल. या दोन टोकांच्या हवामानाचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील तापमानात चढ-उतार पाहायला मिळतील. मार्च महिना सुरू होताना उन्हाची तीव्रता अधिक वाढण्याचे संकेतही हवामान तज्ज्ञांनी दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here