पुणे: मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीचा फटका केवळ सर्वसामान्यांनाच नाही, तर उद्योजकांनाही बसत आहे. या कोंडीला कंटाळून एका बड्या उद्योजकाने चक्क खासगी हेलिकॉप्टर मागवून आपला पुढचा प्रवास पूर्ण केला. या घटनेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून, उद्योजकाने सरकारला पायाभूत सुविधांबाबत घरचा आहेर दिला आहे.
सलग दोन दिवस मुंबई-पुणे महामार्गावर टँकर अपघात आणि तांत्रिक बिघाडामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तासनतास एकाच जागी अडकून पडल्यामुळे महत्त्वाच्या बैठकांना उपस्थित राहणे अशक्य झाल्याचे पाहून, या उद्योजकाने वेळ वाया न घालवता हेलिकॉप्टरचा पर्याय निवडला. लोणावळ्याजवळील एका खाजगी जागेवर हेलिकॉप्टर उतरवून त्यांनी पुणे गाठले.
सरकारला मोलाचा सल्ला
पुणे गाठल्यानंतर या उद्योजकाने संताप व्यक्त करत सरकारला मोलाचा सल्ला दिला आहे. “जर देशाला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवायची असेल, तर रस्ते आणि वाहतूक व्यवस्था आंतरराष्ट्रीय दर्जाची हवी. तासनतास महामार्गावर अडकून पडल्याने इंधन आणि वेळ या दोन्ही मौल्यवान गोष्टींचे नुकसान होते,” असे त्यांनी नमूद केले. तसेच, केवळ टोल वसूल न करता आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणा अधिक वेगाने कशा कार्यरत होतील, याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सुनावले.



