कणकवली: सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण तापले असतानाच, कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा आपल्या आक्रमक शैलीत विरोधकांना डिवचले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, “मशाल चिन्ह दिसले की मी निधी कमी करतो,” असे विधान करत त्यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.
“चिन्ह पाहूनच निधी वाटतो” – फोंडा जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रचारसभेत बोलताना नितेश राणे यांनी स्पष्टपणे सांगितले की, विकास निधी देताना ते राजकीय पक्ष आणि चिन्हाचा विचार करतात. ते म्हणाले, “जेव्हा मला कमळ किंवा धनुष्यबाण हे महायुतीचे चिन्ह दिसते, तेव्हा मी तत्काळ निधी मंजूर करतो. मात्र, चुकून जर मशाल चिन्ह समोर आले, तर असलेला निधीही मी कमी करून टाकतो.”
सरपंचांना दिला होता ‘हा’ अल्टिमेटम – नितेश राणे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या आठवणींना उजाळा देत म्हटले की, त्यांनी सर्व सरपंचांना आधीच ताकीद दिली होती. “आम्हाला ग्रामपंचायत द्या, तरच निधी मिळेल, अन्यथा एक रुपयाही मिळणार नाही, असे मी स्पष्ट बजावले होते. म्हणूनच आज सर्व सरपंच आमच्या पाठीशी उभे आहेत,” असा दावाही त्यांनी यावेळी केला.
उद्धव सेनेवर निशाणा आणि १ कोटींची घोषणा – उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर (यूबीटी) टीका करताना राणे म्हणाले की, त्यांचे उमेदवार प्रचारात कुठेही दिसत नाहीत. “निवडणुकीनंतर पुन्हा निधी मागण्यासाठी त्यांना आमच्याकडेच यावे लागणार आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला.
विशेष म्हणजे, निवडणुकीची आचारसंहिता लागू असतानाच, “या मतदारसंघातून मला नंबर वनची आघाडी द्या, मी लगेच एक कोटींचा निधी देतो,” अशी मोठी घोषणा नितेश राणे यांनी केली आहे. आता या विधानावर निवडणूक आयोग किंवा विरोधी पक्ष काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



