मतदानाच्या पूर्वसंध्येला राडा; राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पतीवर दगडफेक

0
19

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आंबेठाण–पाईट जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनीता बुट्टे यांचे पती आणि माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे-पाटील यांच्यावर शुक्रवारी रात्री धामणी येथे अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. मतदानाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, शरद बुट्टे-पाटील हे शुक्रवारी रात्री आपल्या एका सहकाऱ्यासह धामणी येथील मित्राकडे जात होते. यावेळी हल्लेखोरांनी धामणी गावाकडे जाणारा रस्ता मोठे दगड टाकून अडवून धरला होता. रस्ता नेमका कोणी आणि का बंद केला आहे, हे पाहण्यासाठी बुट्टे-पाटील आपल्या वाहनातून खाली उतरले. ते खाली उतरताच आधीच दबा धरून बसलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर अचानक जोरदार दगडफेक सुरू केली. या अनपेक्षित हल्ल्यात बुट्टे-पाटील यांच्या डोक्याला आणि शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली, तर त्यांच्यासोबत असलेला सहकारी देखील या घटनेत जखमी झाला आहे.

हल्ल्यानंतर दोघांनाही तातडीने वासुली फाटा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. शरद बुट्टे-पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात येत असले तरी, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) डॉक्टरांच्या विशेष पथकाकडून उपचार सुरू आहेत. निवडणुकीच्या ऐन धामधुमीत आणि मतदानाच्या आदल्या रात्रीच हा प्रकार घडल्याने राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here