सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा जागेवर भाजप,शिंदे गट, पक्षाकडून रस्सीखेच सुरू आहे.प्रत्येक पक्ष आमचाचं
उमेदवार असला पाहिजे असे दावे प्रतिदावे करतायत.मात्र शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सिंधुदुर्गामध्ये लावलेला बॅनर लक्षवेधी ठरला आहे.त्यामुळे जिल्ह्यातच अधिक चर्चेला उधाण आले आहे.मात्र दोन्ही बाजूंनी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर लोकसभा उमेदवारी बाबत कोणतेही चर्चा झालेली नसून मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे आपल्यालाच उमेदवारी मिळणार अशा आशयाने सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात बॅनर लावले आहेत.
भाजपच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची गेल्या आठवड्यात बैठक झाली तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘भावी’ खासदारांना सुनावले. ‘काही ठिकाणी ‘तसे’ बोर्ड लागत आहेत; पण कोणी स्वत:ला ‘भावी’ वगैरे समजत असेल तर त्याचा करेक्ट कार्यक्रम झालाच म्हणून समजा’, – या फडणवीसांच्या वाक्यातला गर्भितार्थ महत्त्वाचा आहे. भाजपसाठी ‘मोदी की गॅरेंटी’ ही महत्त्वाची घोषणा आहे; पण भाजपच्या लोकसभा उमेदवारीची गॅरंटी आज कोणीही देऊ शकत नाही. ‘पुढचा खासदार मीच’ असे छातीठोकपणे सांगणे आजतरी जोखमीचे आहे.त्यामुळे सामंत हे उमेदवारीचे बाशिंग बांधून असून त्यांना भाजप आणि शिंदे गटाकडून संधी मिळणार का?असा प्रश्न समोर ठाकला आहे.
खासदारकीच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातही सत्तेत असलेले शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्याकडून खासदारकीच्या उमेदवारीसंदर्भात अनेक दावे केले जात आहेत. यामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून प्रामुख्याने राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचे नाव पुढे आहे. तर भाजपकडून प्रमोद जठार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मात्र, या लोकसभा मतदारसंघावर भाजप आणि शिवसेना शिंदे गटानेही दावा केला आहे. तर उबाठा गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपचाच उमेदवार असेल असा मोठा दावा केला आहे. मात्र, यानंतर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई – गोवा महामार्गावर किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या वाढदिवसाचे बॅनर झळकले आहेत. या बॅनरवर “एकच लक्ष मिशन दिल्ली” असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर कोणाचा उमेदवार असेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.