सिंधुदुर्ग – वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा येथे झालेल्या जोरदार पावसाने भुईबावडा पहिलीवाडी येथील शेवरीचा कापाट येथील डोंगराचा अर्धा भाग कोसळला आहे. त्यामुळे अनेक झाडे उन्मळून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. सुमारे दोन एकर परिसराचा डोंगर खचला आहे.
कोकणात अतिमुसळधार पावसाने अक्षरशः दाणादाण उडविली आहे. या अतिवृष्टीचा फटका भुईबावडा परिसराला बसला. पहिलीवाडी येथील शेवरीचा कापाट येथील डोंगराचा अर्धा भाग मोठ्या प्रमाणात कोसळल्याने अनेक झाडे उन्मळून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
वाडीपासून डोंगर काहीसा दूर असल्यामुळे जीवितहानी टळली. अन्यथा मोठी दुर्घटना घडली आहे. अजूनही पावसाची अधूनमधून रिपरिप सुरूच आहे. खचलेल्या डोंगरातील दगड माती सध्या पडीक असलेल्या शेतजमिनीत आली आहे.
तर वाडीनजीक असलेली मोरी गाळाने भरली होती. सरपंच बाजीराव मोरे व ग्रामस्थांनी जेसीबीच्या सहाय्याने गाळ उपसून मोरी मोकळी केली आहे. हा डोंगर भाग बाळाजी बाळकृष्ण मोरे अन्य यांच्या मालकीचा आहे.
घटनेची माहिती मिळताच सरपंच बाजीराव मोरे, आकोबा मोरे, अमित फकीर, यांनी ग्रामस्थांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. सुमारे दोन एकर परिसराचा डोंगर खचला आहे.