सिंधुदुर्ग – जगभरातील कोरोनाचे संकट व भारत-चीन संघर्षाचा मोठा फटका कोकणातील मासेमारीला बसला आहे. भारत व चीन तणावामुळे दोन्ही देशातील वाहतूक बंद असून चिनी बाजारपेठेत जाणारी मासळी बंद झाली आहे. त्यातच श्रावण महिन्यामुळे स्थानिक बाजारातही माशांना उठाव नसल्याने बहुतांश मच्छीमारांचा 1 ऑगस्टचा मुहूर्त हुकला आहे.
समुद्री मासेमारीवर असलेले शासकीय निर्बंध 31 जुलैच्या रात्री संपुष्टात आले आहेत. त्यामुळे 1 ऑगस्टपासून मासेमारीला मुभा मिळाली आहे. मात्र विविध संकटांचा सामना करणाऱया कोकणातील बहुसंख्य मासेमारांनी पहिल्या दिवशी आपल्या नौका समुद्रात लोटलेल्या नाहीत. कोकणातील समुद्रात मोठय़ा प्रमाणात मिळणारा राणी मासा, बोंबील, बगे व इतर छोटय़ा मासळीला चीनच्या मार्केटमध्ये मोठी मागणी आहे. येथील दलाल हे मासे लिलावात खरेदी करून ते मुंबई येथील प्रक्रिया केंद्रात पाठवतात. तेथे ते हवाबंद करून चीनी बाजारपेठेत पाठवले जातात. तर मोठय़ा माशांना आशिया व युरोपीय देशांमध्ये मागणी असते. मात्र सध्या जगावर कोरोनाचे संकट घोंगावत असल्याने व चीन व भारत यांच्यात कमालीचे तणावाचे वातावरण असल्याने या निर्यातीला ‘ब्रेक’ लागला आहे.



