पणजी: आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त उद्या मंगळवार दि. २१ रोजी गोवा भाजपच्यावतीने राज्यभरात विविध ठिकाणी योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील सुमारे ३०० ठिकाणी योग कार्यक्रम होणार आहे. बांबोळी येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित योग कार्यक्रमास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित राहणार आहेत. तर थिवी मतदारसंघातील कोलवाळ येथील श्रीराम हायस्कूलमध्ये सकाळी साडेसहा वाजता आयोजित कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट-तानावडे आणि स्थानिक आमदार तथा मंत्री निळकंठ हळर्णकर उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर या दिनाचे औचित्य साधून पर्यटन खात्याच्यावतीने सायंकाळी ५.३० वाजता आग्वाद किल्ला येथील तुरुंग संग्रहालय येथे योगाचे आयोजन केले आहे. यावेळी केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंग पटेल, पर्यटन मंत्री रोहन खवंटे, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार गणेश गावकर, पर्यटन सचिव रवी धवन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
राजधानी पणजीसह तिसवाडी, बार्देश, पेडणे, सत्तरी, डिचोली, फोंडा, धारबांदोडा, सासष्टी, मुरगाव, केपे, सांगे, काणकोण तालुक्यांबरोबरच वाळपई, म्हापसा, वास्को, मडगाव आदी शहरांत आणि ग्रामीण भागात योगदिनाचे आयोजन केले आहे. या उपक्रमात मुख्यमंत्र्यांसह संबंधित मतदारसंघातील मंत्री, आमदार, पक्षाचे पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पेतून जगभर सुरू झालेला योग दिन संपूर्ण जगभरात उत्साहात साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर राज्यातही योग कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. काही ठिकाणी सकाळी साडेसहा ते साडेसात तर काही ठिकाणी सकाळी ७ ते ८ या वेळेत योग दिन साजरा करण्यात येणार आहे. भाजपच्या विविध मोर्चांचे आणि समित्यांचे पदाधिकारी आणि सदस्य संबंधित ठिकाणच्या कार्यक्रमांचे संचलन करणार आहेत.