सिंधुदुर्ग – स्वत: कोरोनाबाधित असल्याचे लपवून बोहल्यावर उभ्या राहिलेल्या नवरदेवाचे बिंग केवळ विवाह लांबल्यामुळे फुटले. त्यामुळे त्याला गृह विलगीकरणात जावे लागले. शिवाय नियमांचा भंग केल्यामुळे वरपक्षाला ग्रामपंचायतीने ५० हजाराचा दंड ठोठावला. यंत्रणेने विवाह (marriage) म्हणून कानाडोळा न करता सजगता दाखविल्यामुळे हा प्रकार उघड झाला. वर आणि वरपक्षापासून इतरांना होणाऱ्या संसर्गाला सध्यातरी पायबंद बसला. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर मध्ये हा प्रकार घडला.
गुहागर तालुक्यातील एका गावामधील वधू आणि आणखी दुसऱ्या गावातील वर यांच्या विवाहाची प्रांताकडून परवानगीही आणली होती. वधू आणि वराकडील मंडळींनी ४ मे रोजी अँटिजेन टेस्टही केल्या. ५ मे रोजी लग्नाचा मुहूर्त होता. ग्रामपंचायतीने वधूपक्षाकडील कोरोना अहवाल आधीच तपासले होते. विवाहाच्या दिवशी संबंधित गावाचे सरपंच, तलाठी, पोलिसपाटील, तंटामुक्त अध्यक्ष आणि ग्रामसेवक विवाहस्थळी गेले. त्यांनी वरपक्षाकडे कोरोना तपासणीचा अहवाल मागितला. वरपक्षाने आम्ही तपासणी केली आहे; मात्र रिपोर्ट आणले नाहीत, असे सांगितले. त्या वेळी विवाहात अडथळा नको, म्हणून प्रांताच्या आदेशाप्रमाणे विवाह पार पाडा, अशा सूचना करून सर्वजण परतले; मात्र या सर्वांच्या मनात अहवालाबाबत पाल चुकचुकत होती.