मुंबई- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २७ जानेवारीचा बारामती दौरा आणि त्यांचा अचानक बदलेला विमान प्रवास सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात एक खळबळजनक दावा केला असून, दादांना त्या रात्री रस्ते मार्गाने जाण्याचा निर्णय का रद्द करावा लागला, याचा खुलासा केला आहे. रोहित पवार यांच्या मते, अजित पवार यांचा विमान प्रवास पूर्वनियोजित नसून तो ऐनवेळच्या काही घडामोडींमुळे बदलेला होता. २७ जानेवारीच्या संध्याकाळी अजित पवार नेहमीप्रमाणे रस्ते मार्गाने पुण्याला निघणार होते आणि त्यासाठी त्यांचा ताफाही सज्ज झाला होता, मात्र एका महत्त्वाच्या नेत्याची भेट आणि मंत्रालयातील एका फाईलमुळे हा संपूर्ण प्लॅन फिस्कटला.
रोहित पवारांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व विदर्भातील एक मोठे नेते अजित पवारांना भेटण्यासाठी येणार होते, परंतु त्यांना पोहोचायला विलंब झाला. याच दरम्यान एका अत्यंत महत्त्वाच्या फाईलवर सही करण्याची निकड निर्माण झाली. अजित पवार सहसा कोणतीही फाईल प्रलंबित ठेवत नाहीत, मात्र शोध घेतला असता ती फाईल त्यांच्या निवासस्थानी नसून मंत्रालयातील कार्यालयात असल्याचे समोर आले. ती फाईल येईपर्यंत बराच वेळ निघून गेला. या फाईलबाबत अधिक माहिती देताना रोहित पवार म्हणाले की, ही फाईल एका राजकीय कन्सल्टंटच्या कंत्राटाशी संबंधित होती. संबंधित कन्सल्टंटच्या कामाचा फारसा फायदा होत नसल्याने त्याचे कंत्राट रद्द करण्याबाबतची ती फाईल असल्याची चर्चा तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये होती. या सर्व तांत्रिक आणि राजकीय घडामोडींमुळे अजित पवारांना निघायला उशीर झाला आणि अखेर त्यांना गाडीने जाण्याचा विचार सोडून विमानाचा पर्याय निवडावा लागला.



