बागायती नुकसानभरपाई न मिळाल्याने असनियेत उपोषण

0
389

सिंधुदुर्ग – गतवर्षी मुसळधार पाऊस होऊन झालेल्या भूस्खलनात बागायतीच्या मोठया प्रमाणात झालेल्या नुकसानीची भरपाई अद्यापही न मिळाल्याने असनिये येथील आनंद ठिकार यांनी तेथील ग्रामपंचायतीसमोर स्वातंत्र्यदिनी उपोषण केले. सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्यावर तसेच जेष्ठ शेतकरी नेते अण्णा उर्फ वसंत केसरकर यांच्या मध्यस्तीनंतर श्री. ठिकार यांनी उपोषण स्थगित केले.

असनिये-कणेवाडी येथे गतवर्षी मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले होते. नजीकच असलेल्या आनंद ठिकार यांच्या बागायतीत मोठ्या प्रमाणात दगड-माती आल्याने त्यांचे मोठे नुकसान होते होते.त्यावेळी श्री. ठिकार यांनी सदरची बाब सध्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत यांच्या समोर मांडली होती. त्यावेळी तात्काळ पंचनामा करून ठिकार यांना भरपाई देण्याचे आदेश पालकमंत्री तसेच खा. राऊत यांनी दिले होते. मात्र वर्षभराचा कालावधी लोटूनही ठिकार यांना भरपाई मिळाली नाही.

याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदने देऊनही दखल न घेण्यात आल्याने अखेर ठिकार यांनी शनिवारी असनिये येथील ग्रामपंचायतीसमोर उपोषण केले. शेतकरी नेते अण्णा उर्फ वसंत केसरकर यांनी मध्यस्थी करत ठिकार व तहसीलदार म्हात्रे यांच्यासोबत चर्चा केली. भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आल्याने श्री. ठिकार यांनी उपोषण स्थगित केले. मात्र भरपाई न मिळाल्यास पुन्हा उपोषण करण्याचा इशारा ठिकार यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here