बांद्यात १३ वर्षीय शाळकरी मुलगा कोरोनाग्रस्त
सिंधुदुर्ग – बांद्यात कोरोनाबाधिताच्या संपर्कातील एका १३ वर्षांच्या शाळकरी मुलाचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बांद्यातील कोरोनामुळे मयत तरुणाच्या सोबत गोव्यात एकत्र राहत असलेल्या सातार्डे येथील तरुणाचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आल्याची माहिती बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी दिली.
बांद्यात सापडलेल्या कोरोना बाधित तरुणाचे ओरोस येथील जिल्हा कोविड रुग्णालयात उपचार सुरू असताना ७ ऑगस्ट रोजी निधन झाले होते. त्यानंतर तरुणाच्या घरातील ७ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यांचा अहवाल आज आरोग्य विभागाला प्राप्त झाला. त्यामध्ये १३ वर्षीय शाळकरी मुलगा कोरोना बाधित असल्याचे आढळले आहे.
तसेच मयत तरुणाच्या सोबत नोकरीनिमित्त गोव्यात एकत्र राहत असलेल्या सातार्डे येथील युवकाचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. मयत तरुण व कुटुंबियांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा इतिहास तपासण्यात येत असून उर्वरित व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी उद्या बुधवारी घेण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.कोरोना बाधित आढळलेल्या दोन्ही रुग्णांना उपचारासाठी शेर्ले-कास येथील कोविड सेंटर मध्ये ठेवण्यात आल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.



