मडकई मतदारसंघातील बांदोडा येथे निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईकडे प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे गावातील महिला संतप्त झाल्या आहेत. पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत. याआधीही आर.जी पक्षाने ह्या गावकऱ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी पीडब्लूडी खाते तसेच प्रशासनाला जाग येण्यासाठी आवाज उठविला होता. काल परत एकदा गावकऱ्याना घेवून आर.जी. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पीडब्लूडी खात्याकडे मोर्चा नेला. यावेळी आर.जी. चे विश्वेश नाईक, शैलेश नाईक, प्रेमानंद गावडे उपस्थित होते. गावाला पिण्याच्या पाण्यासाठी सार्वजनिक विहीर ही एकमेव स्रोत आहे. परंतु त्या विहीवर सुद्धा धेंपो डॉक मधील कामगारांनी कब्जा मिळविला असून, गावकऱ्यावर अन्याय होत असल्याचे रेव्होलुशनरी गोवन्स पक्षाचे सचिव विश्वेश नाईक यांनी म्हटले आहे .
गावात दिवसाला अधूनमधून फक्त अर्धा एक तास पाणी पुरवठा केला जात असून कित्येक महिन्यापासून हीच परिस्थितीला लोक सामोरे जात आहेत. लोक अक्षरश: प्रशासनाच्या ह्या कारभारामुळे हैराण झालेले आहेत.
ग्रामस्थांनी वेळोवेळी पंचायत तसेच प्रशासनाकडे हा प्रश्न सोडविण्याची मागणी करूनही प्रशासनाकडून योग्य ती दखल घेतली जात नाही. विहिरीचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने उपसल्या जाणाऱ्या पाण्याने आरोग्याला किंवा रात्री-अपरात्री पाण्यासाठी रात्र-रात्र पाण्याची वाट पाहणाऱ्या वृद्ध व महिला अथवा त्यांचे घरात ठेवलेले लहान मुलबाळ यांच्या बाबतीत एखादी वाईट घटना घडल्यावर प्रशासनाला जाग येणार आहे का? अशा अनेक संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांतून येत आहेत. येथे तातडीने पाण्याची समस्या सोडविण्याची मागणी आर.जी. पक्षाने केली आहे.