सिंधुदुर्ग – जिल्ह्यात आज मृगाच्या पावसाचे अर्थात मिरगाचे जोरदार आगमन झाले आहे. मृगाच्या धारांनी वातावरणात आणि नागरिकांत आनंद पेरला आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु झाली आहे. ग्रामीण भागात त्यामुळे शेतीच्या कमानी वेग घेतला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे १० व ११ जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. तसेच १२ जून ते १५ जून या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. परंतु त्याआधीच दोन दिवस सिंधुदुर्गात मृगाचा पाऊस बरसला आहे. त्यामुळे शेतीच्या कामाला आता जोर चढणार आहे. तसेच लोकांची जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी आणि शेतीच्या कामासाठी लगबग दिसून येत आहे. जिल्ह्यात सध्या भात पेरणीची कामे संथ गतीने सुरु होती. पावसाच्या दमदार आगमनाने या कामांनी आता वेग घेतला आहे. अनेक शेतकऱ्यांनी आज मिरागचा मुहूर्त भात पेरणीसाठी साधला आहे. दरम्यान जिल्ह्यात या पावसाने आजपासून लावलेली हजेरी येथील शेतीसाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणारी आहे. विशेष म्हणजे मान्सून महाराष्ट्रात सक्रिय झाला असला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपासून त्याची दमदार सुरवात झाली आहे.