पोलीस महासंचालकांच्या नावाने सायबर फसवणूक; बनावट स्वाक्षरी वापरून वृद्धाकडून सव्वा दोन कोटी उकळले

0
5

मुंबई : शहरात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना आता थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचाही गैरवापर होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक Sadanand Date यांच्या नावाने बनावट वॉरंट पाठवून एका ७७ वर्षीय वृद्ध नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी किशन मकवाना (वय ३५) या आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, Mumbai मधील गोरेगाव परिसरात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला नोव्हेंबर २०२५ मध्ये दोन अज्ञात व्यक्तींनी फोन केला. त्यांनी स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे सांगत वृद्धाच्या आधार कार्डचा गैरवापर करून जम्मू-काश्मीरमध्ये त्यांच्या नावाने बँक खाते उघडण्यात आल्याचा दावा केला.

या खात्यात देशविघातक कारवायांसाठी पैसे जमा होत असल्याचे सांगून आरोपींनी वृद्धाला घाबरवले. चौकशीस सहकार्य न केल्यास तात्काळ अटक केली जाईल, अशी धमकीही देण्यात आली. विश्वास बसावा म्हणून आरोपींनी चक्क पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या बनावट स्वाक्षरीचे वॉरंट तयार करून ते वृद्धाच्या मोबाईलवर पाठवले.

या मानसिक दबावाला बळी पडून १८ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या अवघ्या पंधरा दिवसांत पीडित वृद्धाने आपल्या बँक खात्यांतून २ कोटी २५ लाख रुपये आरोपींनी सांगितलेल्या खात्यांमध्ये वर्ग केले. पैसे मिळताच आरोपींनी त्यांच्याशी संपर्क तोडला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वृद्धाने तात्काळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.

तपासात किशन मकवाना हा इतर सायबर गुन्हेगारांच्या संपर्कात असल्याचे समोर आले असून आर्थिक व्यवहारांसाठी त्याने विविध बँक खात्यांचा वापर केल्याचेही स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या नावाचा गैरवापर करून सायबर फसवणूक होण्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वीही अशाच प्रकारे डिजिटल अरेस्टची भीती दाखवून ७० लाखांची फसवणूक, तसेच एका निवृत्त कर्मचाऱ्याला बॉम्बस्फोट आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अडकवण्याची धमकी देत १६.५ लाख रुपये उकळल्याची प्रकरणे समोर आली आहेत.

या सर्व प्रकरणांचा पोलिसांकडून सध्या सखोल तपास सुरू असून नागरिकांनी अशा फोन कॉल्स किंवा बनावट कागदपत्रांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here